गडचिरोली : हिंसक चळवळीला कंटाळून मुख्य प्रवाहात येणाऱ्या आत्मसमर्पित नक्षलवाद्यांसाठी गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या संकल्पनेतून ‘प्रोजेक्ट संजीवनी’ या महत्त्वकांक्षी उपक्रमाची १४ एप्रिल रोजी सुरवात करण्यात आली. आत्मसमर्पित नक्षलवाद्यांचा मुख्य प्रवाहामध्ये सामील होण्याचा प्रवास सुसह्य व्हावा यासाठी ‘संजीवनी’च्या माध्यमातून सर्व उपक्रम व योजनांचा एकत्रितपणे लाभ देण्यात येणार आहे. या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पित योजनेला नवे बळ मिळाले आहे.राज्य शासनाने २००५ पासून नक्षलवाद्यांसाठी आत्मसमर्पण योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली. यामुळे २०२२ ते २५ मध्ये ५५ आणि आजपर्यंत ७०४ नक्षलवाद्यांनी गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे. त्यांच्या पुनर्वसनासाठी गडचिरोली पोलिसांकडून कायम प्रयत्न केल्या जाते. हिंसक चळवळ सोडून मुख्य प्रवाहात आल्यानंतर त्यांचा सर्वांकश विकास व्हावा यासाठी राज्य शासन आणि पोलीस दलाकडून विविध उपक्रम, योजना राबविल्या जातात. यात ‘प्रोजेक्ट संजीवनी’ या आणखी एका महत्त्वकांक्षी उपक्रमाची १४ एप्रिलरोजी सुरवात करण्यात आली. या उपक्रमांतर्गत पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते आत्मसमर्पित नक्षलवाद्यांकरिता चार स्वतंत्र घराच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. सोबतच आत्मसमर्पितांसाठी असलेल्या योजनांचे एकत्रितपणे सुसूत्रीकरण करण्यात येणार आहे.
या उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली सुरज जगताप, प्रभारी पोलीस उप-अधीक्षक (गृह) विनोद चव्हाण, पोलीस निरीक्षक अरुण फेगडे, निखिल फटींग, रेवचंद सिंगनजुडे तसेच विविध शाखांचे पोलीस अधिकारी व अंमलदार आणि ५० पेक्षा अधिक आत्मसमर्पित नक्षलवादी सदस्य उपस्थित होते.
विविध योजनांची अंमलबजावणी
प्रोजेक्ट संजीवनी अंतर्गत आत्मसमर्पणानंतर केंद्र व राज्य शासनाकाडुम मिळणाऱ्या बक्षीस रकमेचे सुलभ वितरण, भूखंड मिळवून देऊन प्रधानमंत्री आवास योजना व शबरी आवास योजना अंतर्गत गृहप्रकल्प उभारणे, आधारकार्ड, पॅनकार्ड, रेशन कार्ड, जॉब कार्ड आदी ओळखपत्रे उपलब्ध करून देणे. स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण – मोटार ड्रायव्हिंग, शिवणकाम, ब्युटीपार्लर, पशुपालन, नामांकित कंपन्यांमध्ये वेल्डर, टेक्निशियन, ऑपरेटर आदी प्रशिक्षण व रोजगाराची संधी उपलब्ध करून दिल्या जाईल. महिलांच्या सक्षमिकरणासाठी महिला बचत गटांची स्थापना, वैद्यकीय मदत, डोळ्यांच्या उपचारासाठी ऑपरेशन रोशनी, शस्त्रक्रिया, मानसिक व सामाजिक विकासासाठी समुपदेशन, मानसोपचार व ध्यान शिबिरे, सामूहिक विवाह सोहळा व इतर योजनांची अंमलबजावणी केली जाणार आहे
प्रोजेक्ट संजीवनीमुळे आत्मसमर्पित नक्षलवादी सदस्यांना नवजीवनाची संधी मिळून समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने सहभागी होता येईल. –नीलोत्पल, पोलीस अधीक्षक गडचिरोली