नागपूर : भाजपचे खासदार रामदास तडस आणि त्यांचे कुटुंबिय सातत्याने पूजा तडस हित्यावर अन्याय करत आहेत. त्यानंतरही भाजपने त्यांना वर्धा लोकसभेची उमेदवारी दिली. या कुटुंबाची सून व पीडित पूजा तडस मोदी परिवारात नाही काय?, असा प्रश्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपुरातील प्रेस क्लबमध्ये झालेल्या पत्रकारपरिषदेत त्या बोलत होत्या. याप्रसंगी खासदार रामदास तडस यांची सून पूजा तडस उपस्थित होती. सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्याने नागरिकांना मोदीका परिवार, मोदीची गॅरंटी असे मोठे आश्वासन देतात. परंतु भाजपचे खासदार रामदास तडस आणि त्यांचे कुटुंब सतत मन:स्ताप देणाऱ्या पूजा तडस यांच्या अन्यायाकडे ते सपशेल दुर्लक्ष करतात.

हेही वाचा…‘डेटिंग ॲप’च्या माध्यमातून मुंबई-दिल्लीच्या तरुणींचा देहव्यापार; चित्रपट, जाहिरातीत काम करणाऱ्यांचाही समावेश

भाजपने उलट रामदास तडस यांना वर्धा लोकसभेची उमेदवारी दिली. प्रत्यक्षात पूजा तडस ही त्यांचा मुलगा पंकज तडसची पत्नी आहे. पूजावर पंकजने अत्याचार केला. गुन्हा दाखल होणार म्हणून लग्न केले. लग्नानंतर पूजाला एका गाळ्यामध्ये नेवून ठेवले गेले. दरम्यान हे गाळे तडस कुटुंबियांनी दुसऱ्याला विक्री केले. त्यानंतर पूजाला तेथून जबरन बाहेर काढले गेले.

पूजाला एक १७ महिन्याचा बाळ आहे. आता दोघेही बेघर असून त्यांचा उदरनिर्वाहाचाही प्रश्न आहे. पूजाने तिचे सासरे रामदास तडस हिची भेट घेतली असता ते तिला तिचा मुलगा पंकजचाच असल्याचे सिद्ध करण्यासाठी डीएनए करायला सांगतात. या प्रकाराने या कुटुंबाची वृत्ती दिसून येते. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभर फिरून लोकांना आपण सर्व मोदीका परिवार असल्याचे सांगतात. या परिवारात पूजा तडसही येते. त्यातच नरेंद्र मोदी यांची वर्धेला २० एप्रिलला रामदास तडस यांच्यासाठी सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या परिवारातील पूजा तडस यांची भेट घेत आपल्या उमेदवाराची समजूत काढावी, अशीही मागणी सुषमा अंधारे यांनी केली.

हेही वाचा…‘‘…हा तर भाजपाचा डीएनए, आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही” सुषमा अंधारे यांची टीका, म्हणाल्या…

मला उपभोगाची वस्तू म्हणून वापरले – पूजा तडस

रामदास तडस यांचा मुलगा व माझे पती पंकजने लग्नानंतर मला एका फ्लॅटवर नेऊन ठेवले, मला उपभोगाची वस्तू म्हणून वापरण्यात आले. त्याच्यातून बाळाचा जन्म झाला. खासदार रामदास तडस आणि कुटुंबीय म्हणतात बाळाची डीएनए चाचणी करायला सांगतात. खासदार तडस म्हणतात, मी मुलाला बेदखल केले, मुलाला घरातून काढले नाही, मग मला एकटीलाच का काढले? माझ्याशी राजकारण कशाला करता. मी डीएनए चाचणीसाठी तयार आहे. मात्र, ती न्यायालयाच्या माध्यमातून करा. मला दोन वेळचे अन्नही दिले जात नाही. मोदीजी तुम्ही रामदास तडस यांची सभा घेण्यासाठी लवकरच वर्ध्यात येणार आहात. तेव्हा मला दोन मिनिटांचा वेळ द्या. तडस कुटुंबीयांनी मला न्याय दिला नाही. म्हणून मी लोकांच्या न्यायालयात न्याय मागण्यासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला, असे पूजा तडस म्हणाल्या.

हेही वाचा…“भाजपाचे सरकार आले तर काहींना पाकिस्तानात पाठवले जाईल?” नितीन गडकरी याबाबत पंतप्रधान मोदींसमोर काय म्हणाले? वाचा…

तडस कुटुंबिय म्हणतात…

खासदार रामदास तडस म्हणाले, पूजा तडस आणि पंकज तडस यांचे तीन वर्षांपूर्वी लग्न झाले. काही दिवस दोघांचा सुखी संसार सुरू होता. पण काही समाजकंटकांनी पुजा तडस यांना हाताशी धरुन काही कट रचले. यासंदर्भातील संपूर्ण कॅसेट पंकज तडस यांनी न्यायालयात सादर केली. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्यामुळे मला जास्त काही बोलता येणार नाही. पण हे प्रकरण विरोधकांचा डाव आहे. विरोधी पक्षाला हाताशी धरुन लोकसभेची उमेदवारी दाखल करायची, पत्रकार परिषद घ्यायची, हा कट आहे. त्यांनी वाट्टेल ते आरोप माझ्यावर केले आहेत. पंकज तडस म्हणाले, १० लोकांनी मला हनी ट्रॅप करुन फसवल्याचे सर्व पुरावे मी न्यायालयासमोर सादर केले. त्यांच्यावर गुन्हेही दाखल आहे. काहीजण जामिनावर बाहेर आहे. पूजा तडस जाणूनबुजून न्यायालयात हजर राहत नाही. आम्ही यांच्याविरोधात खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हाही दाखल केला. मी माझा विवाह रद्द करण्यासाठी न्यायालयात दादही मागितली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sushma andhare accuses bjp mp ramdas tadas family of injustice towards daughter in law pooja tadas demands justice ahead of pm modi s wardha meeting mnb 82 psg