अमरावती : खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या निवडणूक लढणार असल्याच्या चर्चेला खुद्द सुषमा अंधारे यांनी पूर्णविराम दिला आहे. तांत्रिकदृष्ट्या आपल्याला अमरावती लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढता येणार नाही, असे सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केले आहे.
आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे गट आणि भाजपला जोरदार टक्कर देण्याचा निश्चय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने केल्याचे दिसून आले आहे. भाजपच्या सहयोगी खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून काल जिल्हाप्रमुख आणि जिल्हा संपर्कप्रमुखांची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत प्रामुख्याने २०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली. अमरावती मतदारसंघावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संपूर्ण लक्ष आहे. कोणत्याही परिस्थितीत या मतदारसंघातून लोकसभेवर आपला उमेदवार निवडून आणण्याचे निश्चित करण्यात आले आहे. नंतर सुषमा अंधारे या अमरावतीतून निवडणूक लढणार असल्याची चर्चा रंगली.
परंतु अमरावतीची जागा ही अनुसूचित जातीसाठी राखीव आहे आणि मी त्या प्रवर्गात बसत नसल्याने या चर्चा निरर्थक आहेत. माझ्यापर्यंत लोकसभा लढण्यासंदर्भात कोणतीही चर्चा झाल्याची माहिती नाही, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. आपण संघटनेसाठी काम करण्यास अधिक इच्छूक आहोत. पक्ष सांगेल, ती जबाबदारी आपण स्वीकारणार आहोत. कालच्या जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत लोकसभा मतदार संघातील उमेदवारीसंदर्भात कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे, अमरावतीतून निवडणूक लढण्यासाठी ठाकरे गटाकडून राज्याच्या अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे माजी अध्यक्ष ज.मो. अभ्यंकर यांनी चाचपणी सुरू केली आहे. त्यांनी यासंदर्भात जनसंपर्क सुरू केल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांनी दिली.