अमरावती : उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस शब्द पाळत नाहीत. आता एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाचे काही खरे नाही. ते केव्हा जाईल याचा नेम नाही. अजित पवार केव्हाही मुख्यमंत्री होतील अशी स्थिती आहे. भाजपा नेते केवळ उपयोग करून घेतात. त्यानंतर फेकून देतात, अशी टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्‍या नेत्‍या सुषमा अंधारे यांनी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमरावतीत शिवसेना ठाकरे गटाच्‍या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलताना सुषमा अंधारे यांनी भाजपावर जोरदार टीका केली. त्‍या म्‍हणाल्‍या, भाजपाने सोमय्या यांनाही वापर करून फेकून दिले आहे. सोमय्या यांची आक्षेपार्ह चित्रफित भाजपानेच प्रसारित केल्‍याचा संशय आहे. ही चित्रफीत चर्चा करावी अशी नाही. मात्र आता अनेकांचे वस्त्रहरण करणाऱ्याचे वस्त्रहरण झाले आहे.

हेही वाचा – पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा शिक्षण क्षेत्राशी काडीचाही संबंध नाही, उद्घाटन सोहळा उधळून लावण्याचा आदिवासी युवा विकास परिषदेचा इशारा

सुषमा अंधारे यांनी खासदार नवनीत राणा यांच्यावरही टीका केली. हनुमान चालीसा ‘मातोश्री’वर म्हणण्याची काय गरज आहे. त्यांना हनुमान चालीसा येत नाही व पाठही नाही. श्रीकांत शिंदे यांनी हनुमान चालिसा म्हटली, पण, हनुमान चालिसा म्हटल्याने देशातील किती प्रश्न सुटले? लोकप्रतिनिधींनी लोकांचे प्रश्न मांडले पाहिजे, मात्र ते मांडले जात नाहीत, असे त्‍या म्‍हणाल्‍या.

आरोग्य विभागाच्‍या एवढ्या जागा रिक्त असताना भरल्या जात नाहीत, त्यावर यांना कधी प्रश्न विचारले जात नाहीत आणि तेदेखील यावर बोलत नाहीत. हनुमान चालिसा म्हणण्यापेक्षा किंवा उर्जा वाया घालवण्यापेक्षा ठाण्यात जे रुग्ण दगावले त्याकडे लक्ष दिले जात नाही. जात आणि धर्माच्या नावावर फक्त भडकवण्याचे काम सुरू आहे, असा आरोप त्‍यांनी केला.

हेही वाचा – तलाठी पदे चार हजारांवर तर इच्छुकांची संख्या दहा लाखांवर

संभाजी भिडे सारखा माणूस आमच्या महापुरुषांबद्दल गरळ ओकत आहे. हा कोणता धर्म असू शकतो. एखाद्याने फक्त फेसबुकवर पोस्ट लिहिली तरी त्याच्यावर कारवाई केली जाते, इथल्या महापुरुषांबद्दल अगदी वाटेल त्या पद्धतीने गरळ ओकणाऱ्या भिडेंना मात्र भाजपा पाठीशी घालते, असा आरोप अंधारे यांनी केला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sushma andhare comments on eknath shinde she said that ajit pawar will become chief minister anytime mma 73 ssb