लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : आम्हाला शिवसेनेचा गट म्हणू नका. प्रत्यक्षात खरी शिवसेना असल्याचा दावा करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लोकसभेच्या जागेच्या वाटाघाटीसाठी दिल्लीत मुजरे- हुजरे करण्यासाठी का जातात, असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला.

नागपुरातील प्रेस क्लबमध्ये झालेल्या पत्रपरिषदेत त्या बोलत होत्या. सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या, निवडणूक आयोगाने एक कागद काढल्यास कुणी खरी शिवसेना होत नाही. शिवसेना- भाजप युती असतांना दिल्लीतील भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षासह सगळे वरिष्ठ नेते वाटाघाटी करण्यासाठी मुंबईतील मातोश्रीवर येत होते. आता स्वत:ला खरी शिवसेना सांगणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्लीत भाजप नेत्यांकडे मुजरे- हुजरे करण्यासाठी जावे लागते. तेथेही ४- ८ जागेवर समाधान मानावे लागते. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दम असल्यास त्यांनी भाजप नेत्यांना वाटाघाटी साठी ठाण्यातील टेंभी नाका येथील स्वत:च्या निवासस्थानी बोलावून दाखवावे. दरम्यान उद्धव ठाकरे आताही राज्यात ताठ मानेने २१ लोकसभेच्या जागा लढवत आहे. गद्दारीनंतर उद्धव ठाकरे साहेबांना १३ जण सोडून गेले. परंतु आताच्या निवडणूकीत त्याहून जास्त खासदार निवडणून आणण्याची धमक केवळ उद्धव ठाकरे साहेबांकडे आहे. त्यामुळे आमचीच शिवसेना ही खरी असल्याचाही दावा सुषमा अंधारे यांनी केला.

आणखी वाचा- भंडारा : जनविकास फाऊंडेशनचा काँग्रेसचे डॉ. प्रशांत पडोळेंना पाठिंबा, माजी आमदार चरण वाघमारेंची भूमिका स्पष्ट

प्रफुल्ल पटेल यांची १४९ कोटींची फाईल अचानक बंद कशी?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजीत पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल नागरी उड्डयनमंत्री असतांना १४९ कोटींच्या प्रकरणाची चौकशी केंद्र सरकारकडून सुरू होती. त्यावेळी ते विरोधी बाकांवर होते. परंतु ते भाजपसोबत जाताच ही फाईल बंद करण्यात आली. त्यावरून भाजपसोबत जाताच अशी काय जादू होते की अनियमिततेंची फाईल संबंधित नेत्यांची बंद होते, असाही सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला.

सुधीर मुनगंटीवार यांची उमेदवारी रद्द करा

भारतीय जनता पक्षाकडून विरोधी पक्षाचे सरकार असलेल्या राज्यांमध्ये महिला अत्याचाराच्या विरोधात मोर्चेसह आंदोलन करण्याचा देखावा होतो. परंतु ॲथलेटिकमध्ये सुवर्णपदक मिळवलेल्या खेळाडूंवर अन्याय करणाऱ्यांकडे सर्रास दुर्लक्ष करणे. मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढल्यावरही त्याकडे दुर्लक्ष करण्याचे काम होते. मोदींच्या सभेत चंद्रपूरचे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी खूपच खालच्या पातळीचे वक्तव्य केले. त्यामुळे सुधीर मुनगंटीवार यांची उमेदवारी रद्द करण्याची आमची मागणी असल्याचेही सुषमा अंधारे म्हणाल्या.

आणखी वाचा- धक्कादायक! ‘स्विमिंग पूल’मध्येच हृदयविकाराचा झटका

श्रीरामाचे वारसदार, मग एक पत्नी, एक विचाराची शिकवण द्या

भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून ते प्रभू श्रीराम यांचे वारसदार असल्याचा भास निर्माण केला जातो. परंतु श्रीराम यांचा एक पत्नी विचारांचा त्यांना विसर पडतो. महिला खेळाडूंनी गंभीर आरोप केलेल्या ब्रिजभूषण शरण सिंह, शिवसेनेच्या शिंदे गटाचे खासदार राहूल शेवाळे आणि इतरही भाजप नेत्यांच्या महिलेबाबतच्या अनेक प्रकरणात त्यांना श्रीराम आठवत नाही. भाजपला खरेच श्रीरामाचे वारसदार दाखवायचे असल्यास त्यांनी प्रथम त्यांच्या प्रत्येक नेत्याला एक वचनी, एक पत्नी विचार शिकवण्याची गरज असल्याचेही सुषमा अंधारे म्हणाल्या.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sushma andhare criticizes chief minister eknath shinde in nagpur mnb 82 mrj