राज्यातील अस्थिर सरकार लक्षात घेता कधीही निवडणुका लागू शकतात. या माध्यमाने गद्दारांना कायमचा धडा शिकवण्यासाठी, त्यांच्या हातातील धनुष्यबाण हिसकावून घेण्यासाठी, ‘मातोश्री’वर होणारे हल्ले रोखण्यासाठी आणि आरपारच्या लढाईसाठी निष्ठावान शिवसैनिकांनी सज्ज राहावे, असे आवाहन ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केले.
हेही वाचा- भंडारा : अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू; पाच महिन्यांत तिसरी घटना
दिल्लीश्वराच्या आशीर्वादाने सुरू असलेल्या व्यापक व सुनियोजित कटकारस्थान आणि दडपशाहीने उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना व लाखो निष्ठावान दबणार व खचणार नसून शेवटी विजय आमचाच होणार असल्याचा दावाही त्यांनी बोलून दाखवला. ठाकरे गटाच्या शिवगर्जना सप्ताह अभियानांतर्गत आज, बुधवारी सायंकाळी उशिरा खामगाव येथे पार पडलेल्या जाहीर सभेत त्या बोलत होत्या. महात्मा गांधी चौकात आयोजित या सभेला जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर, जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत, दत्ता पाटील, वसंत भोजने, आशीष रहाटे, चंदा बढे यांच्यासह शिवसैनिक बहुसंख्येने उपस्थित होते.
हेही वाचा- उडत्या विमानातून धूर; नागपुरात इमर्जन्सी लँडिंग
यावेळी अंधारे म्हणाल्या की, मागील आठ महिन्यांत सत्तेचा गैरवापर होत आहे. सुनियोजित कारस्थान द्वारे ‘मातोश्री’ वर हल्ले चढवण्याचे प्रयत्न सुरू आहे. एकेकाळी गल्ली ते दिल्ली काँग्रेसची सत्ता होती, पण त्यांनी कधी शिवसेना संपवण्याची भाषा केली नाही. बाळासाहेब ठाकरे व शरद पवार यांच्यात प्रचंड मतभेद होते, पण त्यांनी कधी सेना संपवण्याची भाषा केली नाही. यामुळे आज उद्धव ठाकरे मराठी माणूस व महाराष्ट्राचे हित जोपासणाऱ्यांसोबत आहे, असे त्यांनी ठणकावून सांगितले. शिवसेनेतून अनेक नेते बाहेर पडले पण त्यांनीही ही भाषा केली नाही. पण खोकेबाजांच्या मदतीने शिवसेना संपवण्यासाठी भाजपचे हात शिवशिवत आहे. यंत्रणांचा गैरवापर करून आम्हाला दाबण्याचे प्रयत्न होत आहे. ८० टक्के समाजकारण अन २० टक्के राजकारण या शिवसेनेच्या गाभ्यावर घाव घालण्याचा ‘कुणीतरी’ प्रयत्न करतोय. मात्र यामुळे खचणार नसून अंती आम्हीच जिंकणार, असा निर्धार अंधारे यांनी बोलून दाखवला.