चंद्रपूर : लोकसभा उमेदवारी दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी एकाही उमेदवाराने नामनिर्देशन अर्ज दाखल केला नाही. काँग्रेस पक्षात उमेदवारीवरून घोळ सुरूच आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार की आमदार प्रतिभा धानोरकर, याबाबतचा ‘सस्पेन्स’ कायम आहे. येथे नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यास २० मार्चपासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी १३ व दुसऱ्या दिवशी १९ अशा एकूण ३२ इच्छुकांनी नामनिर्देशन अर्ज घेतले. मात्र, एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केलेला नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> बुलढाणा : उमेदवारीची घोषणा लांबणीवर! युती व आघाडीतील चित्र; उलटफेर होण्याचे संकेत

महायुतीचे अधिकृत उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचा प्रचार, जाहीर सभा, जनसंपर्क सुरू झालेला आहे. महाविकास आघाडीत चंद्रपूरची जागा काँग्रेस पक्षाला सुटली आहे. मात्र, काँग्रेसच्या उमेदवारीचा गोंधळ दिल्ली-मुंबई असा सुरू आहे. काँग्रेसच्या केंद्रीय समितीने विरोधी पक्षनेेते विजय वडेट्टीवार व आमदार प्रतिभा धानोरकर या दोघांपैकी एकाला संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातही विजय वडेट्टीवार लोकसभा लढण्यास तयार नसतील तर मग प्रतिभा धानोरकर यांना संधी द्या, असे स्पष्ट केले आहे. मात्र, उमेदवार कोण? हा ‘सस्पेन्स’ कायम आहे. काँग्रेस उमेदवारीचा घोळ सुरू असताना कुणबी समाजाच्यावतीने विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात ‘चुकीला माफी नाही’ म्हणून एक पत्रक समाज माध्यमावर व्हायरल केले आहे, तर तेली समाजानेदेखील काँग्रेसने चंद्रपुरातून उमेदवारी दिली नाही तर वेगळी व ठोस भूमिका घेण्याचा इशारा दिला आहे. प्रतिभा धानोरकर यांच्या बंगल्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकत्र येवून प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी न दिल्यास राजीनामा सत्र सुरू करण्याचा इशारा दिला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suspense continues over vijay wadettiwar and mla pratibha dhanorkar for lok sabha candidate for chandrapur rsj 74 zws