लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मेहकर: मेहकर एसटी बस आगारातील अकरा बस चालक व वाहकांना निलंबित करण्याचा निर्णय तीनच दिवसांत मागे घेण्यात आला आहे. यामुळे हा कामगार संघटनेच्या आंदोलनाचा धसका की चुकीच्या निर्णयाबद्दल महामंडळाची उपरती? असा प्रश्न चर्चिला जात आहे.

विभागीय वाहतूक अधीक्षक ( अपराध) यांनी निलंबन मागे घेण्यासंदर्भातील आदेश निर्गमित केले आहे. मेहकर आगाराच्या अकरा चालक वाचकांना मागील २१ मार्च २०२३ रोजी सेवेतून निलंबित करण्यात आले होते. या कारवाईला जेमतेम तीन दिवस होत नाही तोच ही कारवाई रद्द करण्यात आल्याचे आदेश काढण्यात आले. या कर्मचाऱ्यांचे निलंबन २४ मार्चच्या दुपार नंतर मागे घेण्यात आल्याचे आदेशात नमूद आहे. यामुळे अकरा कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला असतानाच आगारातील कर्मचाऱ्यात जल्लोषाचे वातावरण आहे.

काय आहे प्रकरण?

सिंदखेड राजा येथील बसस्थानकात मुक्कामी असलेल्या बसगाड्यांमध्ये हे अकरा कर्मचारी थांबले नसल्याचे आढळून आले होते. त्यामुळे तपासणी पथकाच्या अहवालानंतर वाहतूक अधीक्षक (अपराध) यांनी निलंबनाची कारवाई केली होती.

निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये रमेश भालेराव, अनंता मुंढे, आर बी मुंढे, दिनकर घुगे, गणेश देव्हरे, विलास वाघमारे या चालकांचा तर संदीप गीते, लता चौधरी, के.एस. घुगे, रिता राठोड , रमा चव्हाण या वाहकांचा समावेश होता. या कारवाईत महिला कर्मचाऱ्यांचाही समावेश असून रात्री बसमध्ये महिला कर्मचारी कशा काय मुक्कामी राहू शकतील? असा प्रश्न संघटनेने उपस्थित केला होता. हे सर्व कर्मचारी जेवणासाठी गेले होते, तेव्हा तपासणीची कार्यवाही करण्यात आली. ही कारवाई चुकीची असल्याने निलंबन मागे घेण्याची मागणी एसटी कष्टकरी महासंघाने विभाग नियंत्रकांकडे केली होती. कारवाई मागे न घेतल्यास आगार बंद करण्यात येईल, असा इशारा विभागीय सचिव राम सवडदकर, आगार अध्यक्ष अनिल पचपोर व सचिव छगन मुळे यांनी दिला होता.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suspension of eleven st driver carriers cancelled in just three days scm 61 mrj
Show comments