लोकसत्ता टीम
नागपूर : दिल्लीहून निघालेल्या दक्षिण एक्सप्रेसच्या एका वातानुकूलित डब्यातील प्रवाशांना तब्बल तीन तास जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागला. गाडी सायंकाळी ५ च्या सुमारास नागपुरात पोहोचली आणि प्रवाशांनी फलाटावर अक्षरश: उड्या घेतल्या.
दक्षिण एक्सप्रेसच्या एका डब्यात एक बेवारस बॅग आढळून आली. त्यामुळे स्फोटक असल्याची शंका प्रवाशांमध्ये निर्माण झाली. त्यामुळे अनेकांनी त्या बॅगजवळ असलेले आपले आसन (बर्थ) सोडून प्रवेश द्वाराजवळ उभे राहून प्रवास करणे पसंत केले. आमला ते नागपूरपर्यंत जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागला.
आणखी वाचा-पत्नी विरहातून घर सोडले, १५ वर्षानंतर कुटुंबात परतला; नागपुरातील मेयो रुग्णालयात…
हजरत निजामुद्दीन ते हैदराबाद दक्षिण एक्स्प्रेसच्या थर्ड एसी डब्यात बर्थ क्रमांक ६६ खाली एक बेवारस बॅग पडून होती. त्यात स्फोटके असल्याचा संशय प्रवाशांना आला. आमला रेल्वे स्थानकावरून गाडी नागपूरकडे निघाल्यानंतर एका प्रवाशाने या बॅगमध्ये स्फोटके असल्याचा संशय व्यक्त करणारी तक्रार रेल्वे नियंत्रण कक्षाकडे केली. त्यामुळे नागपूर रेल्वे पोलिस, रेल्वे सुरक्षा दल अलर्ट मोडवर आले. त्यांनी बॉम्ब शोधक आणि नाशक पथक (बीडीडीएस), डॉग स्कॉड सज्ज केले.
नागपूर स्थानकावर गाडी आल्यानंतर सर्व प्रवाशांना बाजूला करून श्वानाच्या मदतीने बॅगची तपासणी करण्यात आली. बॅगमध्ये स्फोटके नसल्याचे संकेत श्वानाने दिले. बॅग उघडून बघण्यात आले. त्यात कपडे आणि काही कागदपत्रे आढळली. त्यानंतर जीआरपी, आरपीएफने संपूर्ण गाडीची कसून तपासणी केली. बॅगेत स्फोटक नसल्याचे समजल्यावर सुमारे तीन तासांपासून घाबरत प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा जीव भांड्यात पडला. दक्षिण एक्सप्रेसमध्ये बेवारस आढलेल्या बॅगमध्ये काहीही धोकादायक नसल्याची खात्री पटल्यानंतर अर्धा तास विलंबाने ही गाडी हैदराबादकडे रवाना करण्यात आली.
हजरत निजामुद्दीनहून हैदराबादकडे निघालेल्या दक्षिण एक्स्प्रेसच्या थर्ड एसी डब्यात बेवारस बॅग आढळून आली. या बॅगमध्ये स्फोटके असल्याचा संशय प्रवाशांना आला. रेल्वे पोलिसांनी बॅगमधील कागदपत्रांच्या आधारे अधिक तपास केल्यानंतर ही बॅग भोपाळ येथील एका प्रवाशाची असल्याची बाब समोर आली. हा प्रवासी घाईगडबडीत आपली बॅगे विसरला होता. पण, त्या प्रवाशाच्या चुकीमुळे या गाडीतील प्रवाशांना तब्बल अडीच-तीन दहशतीत प्रवास करावा लागला. या संपूर्ण प्रकरणाचा तपास रेल्वेच्या पोलीस अधीक्षक डॉ. प्रियांका नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. यामध्ये लोहमार्ग पोलीस गौरव गावंडे यांनी श्वान पथकांच्या मदतीने तपास पूर्ण केला.