नागपूर : नागपुरातील जेष्ठ पत्रकार अरुण फणशीकर (७०, आदित्य अपार्टमेंट, गिरीपेठ) यांचा आज संशयास्पदरित्या विहिरीत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. त्यांनी आत्महत्या केली की त्यांचा खून झाला, याचा तपास पोलीस करीत आहेत.
फणशीकर गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे फिरायला घराबाहेर पडल्यानंतर बेपत्ता झाले होते. ते घरी परत न आल्याने कुटुंबियांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. पोलीस तपास सुरू असतानाच गिरीपेठमधील एका विहिरीत त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या कमरेला दगड बांधलेला होता. त्यामुळे त्यांच्या मृत्यूबाबत घातपाताची शंका व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा – नागपूर : ‘मेमू’ ट्रेन म्हणजे काय? कुठे धावणार
फणशीकर यांनी त्यांच्या पत्रकारितेची सुरुवात नागपुरातील इंग्रजी दैनिक हितवाद येथून केली. ते इंडियन एक्सप्रेसच्या नागपूर आवृत्तीत मुख्य वार्ताहर होते. जनसंवाद विभागातही त्यांनी अनेक वर्षे अध्यापनाचे काम केले होते. ते अविवाहित होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने नागपूरच्या वृत्तपत्रसृष्टीला धक्का बसला आहे.