नागपूर : पेंच व्याघ्रप्रकल्पातील सिल्लारी प्रवेशद्वाराजवळ पूर्व पेंच वनक्षेत्राच्या कुटुंबा बीटमधील कक्ष क्र. ५३१ मध्ये वाघिणीचा मृत्यू झाला. मृत्यूसमयी ती अतिशय अत्यवस्थ होती आणि ओकारी करत होती. पर्यटकांसमोरच तिने प्राण सोडला. मृत्युसमयीची तीची एकूणच अवस्था पाहता हा मृत्यू संशयास्पद असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, राज्यात गेल्या तीन महिन्यात ११ वाघ मृत्युमुखी पडले आहेत.
कुटुंबा बीटमधूनच बरेचदा मासेमारांचे जाणेयेणे असते आणि पेंच प्रशासन व मासेमार यांच्यात कायम एक अघोषित युद्ध आहे, हे सर्वांनाच ठाऊक आहे. त्यामुळे हा वीषबाधेचा प्रकार तर नसावा, अशीही एक शंका व्यक्त केली जात आहे. पेंच व्याघ्रप्रकल्पात सायंकाळच्या सफारीला गेलेल्या पर्यटकांनी वाघिणीच्या शेवटच्या क्षणाबद्दल सांगितले. सिंचन पंप हाऊस परिसरात त्यांना ती दिसली. तिची अवस्था अतिशय वाईट होती. ती पाणी पीत होती आणि तिचा श्वासोच्छवास देखील नियमित नव्हता. तिला थोड्याच वेळात ओकारी झाली आणि काही क्षणातच ती मृत्युमुखी पडली.
हेही वाचा…अकोल्यात तिरंगी लढतीचा जुनाच डाव नव्याने; नवे समीकरण कुणाच्या पथ्यावर?
ही माहिती कळताच पशुवैद्यकीय अधिकारी व पेंचमधील अधिकारी त्याठिकाणी पोहोचले, पण तोपर्यंत ती मृत पावली होती. तिच्या मृत्युबद्दल दोन शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. एक म्हणजे तिला वीषबाधा झाली असावी, पण जर वीषबाधा झाली तर व्याघ्रप्रकल्पात हा प्रकार कसा घडला, असाही एक प्रश्न उपस्थित केला जात आहे. दुसरी एक शक्यता म्हणजे तिला काहीतरी व्याधी झाली असावी, अशीही एक शक्यता आहे. तिच्या शरीरात खूप मोठ्या प्रमाणात संसर्ग झाला होता. शरीरात काही ठिकाणी गाठी तर काही ठिकाणी अळ्या झालेल्या दिसून आल्या. त्यामुळे अवयवाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले.
हेही वाचा…काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकरांकडे ३९ कोटींचे ‘हातउसने’!
वाघिणीचे शवविच्छेदन पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुजित कोलंगथ, पशुधनविकास अधिकारी डॉ. शिशुपाल मेश्राम, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. निखील बांगर यांनी केले. यानंतर सॅडल डॅम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पेंच व्याघ्रप्रकल्पाचे उपसंचालक डॉ. प्रभूनाथ शुक्ल, विभागीय वनाधिकारी सोनल मत्ते, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे प्रतिनिधी म्हणून मानद वन्यजीव रक्षक अजिंक्य भटकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक(वन्यजीव) यांचे प्रतिनिधी म्हणून संजय करकरे, सहाय्यक वनसंरक्षक पूजा लिंबगावकर, वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक राजूरकर, वनपरिक्षेत्र अधिकारी जयेश तायडे व इतर उपस्थित होते.