लोकसत्ता टीम
अमरावती: सध्या बाजारात कापसाचे दर घसरले असून शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळेच हे संकट उद्भवले असून सरकारने कापसाला तेरा हजार रुपये हमीभाव जाहीर करावा अशी मागणी करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या आवारात कापूस फेकला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी यावेळी सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजीही केली.
कॉटन लॉबीच्या दबावात सरकार झुकल्याने कापसाचे भाव पाडल्या गेले. सध्या मिळणाऱ्या सात हजारांपर्यंतच्या भावात उत्पादन खर्च निघणे कठीण असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला. मागच्या हंगामात अतिवृष्टी व सततच्या पावसाने कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यामुळे सरासरी उत्पादनात कमी आलेली आहे. अशा परिस्थितीत भाव पाडल्याने शेतकरी अडचणीत आलेले आहेत.
हेही वाचा… Health Special: हवामान बदलाचा आरोग्यावर परिणाम, डॉक्टरांचे म्हणने काय?
दरवाढीच्या प्रतीक्षेत अनेक शेतकऱ्यांचा कापूस अद्यापही घरीच पडून आहे. त्यामुळे कापसाला गतवर्षीप्रमाणे १३ हजार रुपयांचा भाव देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमित अढाऊ व प्रवीण मोहोड यांनी केली. यावेळी शासनाचा निषेध करीत घोषणा देण्यात आल्या. आंदोलनात संघटनेचे पदाधिकारी सहभागी होते.