राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाहनांचा ताफा अमरावती शहरातून जात असताना स्वभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ताफ्यासमोर निदर्शने करण्याचा प्रयत्न केला. पण, पोलिसांनी लगेच या कार्यकर्त्यांना अटक केली आणि हा प्रयत्न हाणून पाडला.अखिल भारतीय कलवार कलाल महासभेच्या अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचे आज अमरावतीत आगमन झाले. त्यांनी सायन्स कोर मैदानावरील कृषी प्रदर्शनाला देखील भेट दिली.
हेही वाचा >>>बुलढाणा: पेपरफूट प्रकरणी पाच आरोपी गजाआड, मुख्य सूत्रधार सापडेना
दरम्यान, त्यांच्या वाहनांचा ताफा शहरातून जात असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकत्यांनी घोषणाबाजी केली. कापसाला, सोयाबीनला योग्य भाव मिळालाच पाहिजे, अशी त्यांची मागणी होती. अजूनही जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. कापसाच्या, सोयाबीनच्या किमतीत घसरण होत आहे. कांद्याला तर अत्यंत अल्प भाव मिळत आहे. शेतकरी अडचणीत आहे, पण सरकारचे शेतीच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष आहे. या खोके सरकारच्या काळात शेतकऱ्यांवर अन्याय केला जात आहे, असा आरोप कार्यकर्त्यांनी यावेळी केला. पोलिसांनी निदर्शने करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.