नागपूर: राज्यात मागच्या वर्षीच्या तुलनेत ‘स्वाईन फ्लू’चे रुग्ण वाढले आहेत. सर्वाधिक रुग्ण बृहन्मुंबईत आढळले असले तरी सर्वाधिक मृत्यू मात्र नाशिक आणि नागपुरात झाल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालातून पुढे आले आहे. दरम्यान आता गणेशोत्वाला सुरुवात झाली असून सार्वजनिक मंडळात लोकांची गर्दी असते. येथे स्वाईन फ्लू संक्रमित व्यक्तींमुळे आजार पसरू शकतो.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाच्या अहवालानुसार, राज्यात १ जानेवारी ते २८ ऑगस्ट २०२४ दरम्यान स्वाईन फ्लूचे १ हजार ४४२ रुग्ण आढळले. त्यापैकी ३० रुग्णांचा मृत्यू झाला. सर्वाधिक १३ मृत्यू नाशिकला, नागपुरात ११, साताराला १, अहमदनगरला २, जळगावला १, छत्रपती संभाजीनगरमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला.
हे ही वाचा… नागपूर : मध्यरात्री केला मॅसेज, प्रेयसीची भेट अन् हत्याकांड…
राज्यात सर्वाधिक ४६१ रुग्ण बृहन्मुंबई, २२६ रुग्ण ठाणे, २६० रुग्ण पुणे, १९६ रुग्ण नाशिक, १०३ रुग्ण कोल्हापूर, ५६ रुग्ण छत्रपती संभाजीनगरला, ३७ रुग्ण नागपुरात आढळळे. रुग्णांच्या तुलनेत सर्वाधिक मृत्यूचे प्रमाण मात्र नागपुरात आहे. राज्यात मागील वर्षी २०२३ मध्ये स्वाईन फ्लूचे १ हजार २३१ रुग्ण आढळले. त्यापैकी ३२ रुग्णांचा मृत्यू झाला. परंतु यंदा आठ महिन्यातच मागील वर्षीहून जास्त रुग्ण नोंदवले गेले.
‘स्वाईन फ्लू’ म्हणजे काय?
स्वाइन इन्फ्लूएंझा (स्वाइन फ्लू) हा डुकरांचा श्वसन रोग आहे जो प्रकार ए इन्फ्लूएंझा विषाणूंमुळे होतो. स्वाइन फ्लूचे विषाणू संसर्गजन्य आहे आणि तो माणसापासून माणसात पसरतात.
हे ही वाचा…अमरावती जिल्ह्यातील तीन मतदारसंघांमध्ये तीव्र स्पर्धा, बंडखोरी अटळ
ही आहेत लक्षणे…
स्वाइन फ्लूची लक्षणे नियमित फ्लूच्या लक्षणांसारखीच आहे. त्यात ताप, खोकला, घसा खवखवणे, अंगदुखी, डोकेदुखी, थंडी वाजून येणे आणि थकवा यांचा समावेश आहे. काही लोकांना अतिसार आणि उलट्या झाल्याची नोंद आहे. या विषाणूच्या संसर्गाने गंभीर आजार (न्यूमोनिया आणि श्वसनक्रिया बंद होणे) आणि अनेक मृत्यू झाले आहेत. हंगामी फ्लू प्रमाणे, स्वाइन फ्लूमुळे अंतर्निहित दीर्घकालीन वैद्यकीय स्थिती बिघडू शकते.
संरक्षणात्मक उपाय काय ?
आपले हात धुवा. सामान्य आरोग्य चांगले ठेवण्याचा प्रयत्न करा. गाढ झोप घ्या, शारीरिकदृष्ट्या सक्रिय व्हा, तुमचा ताण व्यवस्थापित करा, भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक अन्न खा. फ्लू विषाणूने दूषित असलेल्या पृष्ठभागांना स्पर्श करू नका. आजारी असलेल्या लोकांशी संपर्क टाळा. त्यांचे कपडे वापरू नका. संक्रमित देशांमध्ये आणि गर्दीच्या ठिकाणी प्रवास टाळा.
स्वाईन फ्लूची स्थिती
वर्ष मृत्यू
२०२१ ३८७ ०२
२०२२ ३,७१४ २१५
२०२३ १,२३१ ३२
२०२४ (२८ ऑगस्ट पर्यंत) १,४४२ ३०