नागपूर : उपराजधानीत डेंग्यूनंतर आता ‘स्वाईन फ्लू’ डोके वर काढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये शहरातील विविध रुग्णालयांत चौघांचा मृत्यू ‘स्वाईन फ्लू’ने झाल्यावर मृत्यू विश्लेषण समितीने मंगळवारी शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.
नागपुरातील विविध शासकीय व खासगी रुग्णालयात दगावलेल्या रुग्णांमध्ये नागपूर शहरातील २, गोंदिया जिल्ह्यातील १, मध्य प्रदेशातील १ अशा एकूण ४ रुग्णांचा समावेश आहे. या रुग्णांना गेल्या काही दिवसांमध्ये ‘स्वाईन फ्लू’ची लक्षणे असल्याने उपचारासाठी नातेवाईकांनी विविध रुग्णालयांत दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या मृत्यूंमुळे शहरातील विविध रुग्णालयांत आजपर्यंत दगावलेल्या रुग्णांची संख्या दहावर पोहचली आहे.
हेही वाचा >>> तोटय़ातील ‘एसटी’ला सावरण्यासाठी कामगार संघटनांना साकडे
नागपुरात १ जानेवारी ते आजपर्यंत ‘स्वाईन फ्लू’चे एकूण ५१ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी सध्या ८ सक्रिय रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहे. अचानक रुग्ण वाढल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागाने या रुग्णाच्या संपर्कातील नातेवाईकांना गाठून त्यांचा इतिहास घेत तपासणी सुरू केली आहे. सोबत त्यांना तपासणी अहवाल येईस्तोवर कुणाच्याशी संपर्कात न येण्याचा सल्ला दिला असून ‘स्वाईन फ्लू’वर जनजागृतीही सुरू करण्यात आल्याची माहिती नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून दिली गेली आहे. नागपूर महापालिकेतील आरोग्य विभागाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीचे अध्यक्ष मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार होते. तर बैठकीला महापालिकेचे साथरोग अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे, मेयो रुग्णालयातील सूक्ष्मजीव शास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. रवींद्र खडसे, डॉ. गुंजन दलाल, जिल्हा परिषदेचे जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. विनोद बिटपल्लीवार आणि खाजगी रुग्णालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मृत्यूंबाबत बैठकीतील निरीक्षण
नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागात १ जानेवारी २०२३ पासून आजपर्यंत ९ स्वाईन फ्लू मृत्यू विश्लेषण समितीच्या बैठकी झाल्या. त्यामुळे एकूण १४ ‘स्वाईन फ्लू’ संशयितांच्या मृत्यूची प्रकरणे ठेवली गेली. त्यापैकी १० मृत्यू ‘स्वाईन फ्लू’ने झाल्याचे घोषित केले गेले. त्यात नागपूर महापालिका हद्दीतील ७ आणि ३ जिल्हा बाहेरील रुग्णांचा समावेश आहे. एकूण मृतांपैकी ५ जणांचा मृत्यू हा ४० ते ६० वयोगटातील आणि ५ दगावलेले रुग्ण हे साठीहून जास्त वयाचे आहे. तर दगावणाऱ्यांमध्ये ५ महिला व ५ पुरुष रुग्णांचा समावेश आहे. दगावणाऱ्यांमध्ये सहव्याधी असलेल्या रुग्णांची संख्या जास्त असल्याचेही निरीक्षण समितीने नोंदवले.
घाबरू नका, योग्य काळजी घ्या
‘स्वाईन फ्लू’ हा पूर्णपणे बरा होतो. त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये, एकही लक्षणे असल्यास तातडीने उपचार घ्यावा. धोके टाळण्यासाठी ज्येष्ठ नागरिक व सहव्याधी असलेल्या रुग्णंनी ‘इन्फल्युएंझा ए’ लसीचा डोस घ्यावा. वैयक्तिक स्वच्छता राखावी, हाथ निर्जंतूक करावे, शिंकताना तोडावर रुमाल धरावा. वारंवार स्पर्श होणाऱ्या वस्तू जागा निर्जंतूक करा. ‘फ्ल्यू’ सदृश्य लक्षणे असल्यास घरीच थांबा, गर्दीत जाऊ नका, भरपूर विश्रांती व पाणी घ्या. ज्येष्ठ नागरिक व सहव्याधी असणाऱ्या व्यक्ती, गर्भवती स्त्रिया, लहान मुले यांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. सगळ्या शासकीय रुग्णालयांत उपचाराची सोय आहे, अशी माहिती महापालिकेचे साथरोग अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे यांनी दिली.