चंद्रपूर : शहरातील पाच चौकात फाऊंटेन बांधकाम व उभारणीच्या सव्वादोन कोटीच्या कामात घोटाळा झाल्याचा आरोप करित जनविकास सेनेच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेसमोर एकत्र येत आंदोलन केले. घोटाळेबाज अधिकाऱ्यांना अटक केल्याचा प्रतिमात्मक देखावा करून नारेबाजी करण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आंदोलनात सहभागी चार कार्यकर्त्यांच्या डोक्यावरून आरोपीप्रमाणे काळा कपडा टाकून त्यांचा चेहरा झाकण्यात आला. अटक केलेल्या सर्व चारही प्रतिकात्मक अधिकाऱ्यांचे हात बांधण्यात आले. सर्व प्रतीकात्मक अधिकाऱ्यांना महापालिका इमारतीच्या पायऱ्यावरून उतरवून शहर पोलीस ठाण्याच्या दिशेने नेण्यात आले. या आंदोलनात मनिषा बोबडे, शोभा यादव, अपर्णा चौधरी, पुष्पा मुळे, माला गेडेकर, किरण कांबळे, निर्मला नगराळे, स्नेहल चौथाले, माया डोईफोडे, दर्शना पाटील, राधिका माणिकपुरी, सचिन आक्केवार, अमुल रामटेके, योगेश निकोडे, सुनील ढेकले, घनश्याम येरगुडे, नरेंद्र लभाने इत्यादी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. फऊंटेन घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करून या घोटाळ्यासाठी जबाबदार आयुक्त विपिन पालीवाल व इतर अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाई करावी अशी मागणी जनविकास सेनेची आहे.

हेही वाचा – कर्तव्यावर असताना एक पाय गमावला, पण पाच किलोमीटरची मॅराथॉन…

हेही वाचा – “फडणवीसांचा उद्योगमंत्र्यांवर दबाव”, कर्जत-जामखेड एमआयडीसीवरून रोहित पवारांचा आरोप

धुळीच्या प्रदूषणाने शहरातील नागरिक त्रस्त आहेत. अशातच शुद्ध हवा कार्यक्रमाअंतर्गत मनपाला शासनाकडून चार कोटी रुपयांच्या वर निधी प्राप्त झाला. धूळ कमी करून नागरिकांना दिलासा देण्याऐवजी मनपाच्या घोटाळेबाज अधिकाऱ्यांनी फाऊंटेन लावण्यासाठी सव्वादोन कोटी रुपयांची निविदा काढली. चौकात फाऊंटेन लावून धूळ कमी करण्याचा जावईशोध अधिकाऱ्यांनी लावला. आजपर्यंत महापालिकेतील कोट्यावधीचे पंधरा घोटाळे पुराव्यानिशी उघडकीस आणले. एकाही घोटाळ्याचे विरोधात स्थानिक आमदार, पालकमंत्री किंवा विरोधी पक्षनेते का बोलत नाही याबद्दल जनतेच्या मनात मोठा असंतोष आहे, असे देशमुख म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Symbolic movement of jan vikas sena in chandrapur against fountain scam rsj 74 ssb