लोकसत्ता टीम
अकोला : अकोला महापालिका प्रशासन निगरगट्ट झाले असून रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी अखेर गणेशभक्तांनाच रस्त्यावर उतरावे लागले आहे. रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी वारंवार निवेदने, आंदालने करून देखील प्रशासनाने कुठलीही कार्यवाही केली नाही. जठारपेठ भागातील गणेशभक्तांसह निलेश देव मित्र मंडळाने लालबागचा राजा गणपतीची मिरवणूक जाणाऱ्या मार्गावरील खड्डे शुक्रवारी बुजवण्यात आले. खड्डे बुजवण्याचे प्रतीकात्मक आंदोलन करून महापालिकेच्या कारभाराचा निषेध करण्यात आला.
शहरातील जठारपेठ भागातून लालबागचा राजा गणपतीची मिरवणूक काढण्याची गत अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे. ती कायम ठेवण्यासाठी गणेश भक्त आज समोर आले. त्यांनी मिरवणुकीचा खडतर प्रवास सुखरुप करण्यासाठी कष्ट घेतले. जठारपेठ भागातील गणेशभक्तांनी आज सकाळपासून गांधीगिरीच्या मार्गाने आंदोलना करून सकारात्मक कार्य केले. या कार्यात त्यांनी मिरवणूक जाणाऱ्या मार्गावर मुरुम, मलबा, गिट्टी टाकून रस्ता सपाट केला. या मार्गावरील मोठ्या ४० खड्ड्यांसह मध्यम व लहान २२० खड्डे बुजवले. सकाळपासून सुरू झालेले हे कार्य सायंकाळपर्यंत पूर्ण करून रस्ता सुस्थितीत आणला. यासाठी दहा ते बारा ट्रक मुरुम आणि मलबा लागला. त्याच बरोबर हा मलबा, मुरुम दबाईसाठी रोड रोलर व त्यावर पाणी टाकण्यासाठी पाण्याचा टँकर अशी सर्व व्यवस्था करण्यात आली होती.
आणखी वाचा-भारतीयांनो, तुमचा प्राणवायू धोक्यात! २१ वर्षात तब्बल ३.५९ लाख हेक्टर….
अनेक गणेश मंडळांची मूर्ती ज्योती नगर भागात तयार होते. मार्ग अत्यंत खडतर असल्याने गणेश मंडळांची तारांबळ उडते. खड्ड्यांमुळे मूर्तीला बाधा पोहोचू शकते. त्यामुळे महापालिकेकडे वारंवार नागरिकांनी निवेदन देत अंतर्गत मार्गाची दुरुस्ती करण्याची मागणी केली. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात वाढले आहेत. मात्र, ढिम्म महापालिका प्रशासनाने काहीच उपाययोजना केली नाही. प्रशासनाने मुरुमाचा एक दगड सुद्धा खड्ड्यांमध्ये टाकला नाही. शेवटी गणेशभक्तांनी पुढाकार घेत आज श्रमदान करून खड्डे बुजवले आहेत. अनेकांनी मुरुम, मलबा, मजुरी, रोड रोलर भाडे आणि पाणी टँकरचे देयक स्वतःच्या खिशातून खर्च केले. प्रशासन झोपेचे सोंग घेत असल्याने लोकहितासाठी सर्वांनी एकत्र येत श्रमदान केले. प्रशासनावर अवलंबुन न राहता सामुहिकपणे समस्या सोडविण्यासाठी जठारपेठमधील नागरिकांचा एकोपा दिसून आला. या श्रमदानातून मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजवल्या गेले.