नागपूर : सिंथेटिक कपडे हे अतिसूक्ष्म तंतूंच्या (फायबर) प्रदूषणासाठी कारणीभूत असल्याचे ‘टॉक्सिक्स लिंक’ या पर्यावरणीय गटाने गुरुवारी प्रकाशित केलेल्या ‘डर्टी लाँड्री : थ्रेड्स ऑफ पोल्युशन – मायक्रोफायबर्स’ या अभ्यास अहवालात म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कपडे धुतले जात असताना या धुतलेल्या कपडय़ाच्या प्रतिकिलो १२४ ते ३०८ मिलिग्रॅम अतिसूक्ष्म तंतू बाहेर पडतात. जागतिक महासागरामध्ये अतिसूक्ष्म प्लास्टिकच्या तुलनेत ३५ टक्के भर सिंथेटिक कपडय़ांमुळे घातली जाते, असेही या अभ्यासात म्हटले आहे.

‘पॉलिस्टर’, ‘अ‍ॅक्रेलिक’, ‘नायलॉन’ यासारख्या ‘सिंथेटिक’ साहित्यापासून तयार करण्यात आलेल्या पोशाखांमध्ये प्लास्टिकचा समावेश असतो. जागतिक स्तरावर सुमारे ६० टक्के कपडे ‘सिंथेटिक’चे वापरले जातात. या अभ्यास अहवालात भारतातील अतिसूक्ष्म तंतूच्या प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषत: ‘सिंथेटिक’ पोशाखांनी देशातील मोठी बाजारपेठ ताब्यात घेतली आहे. हे ‘सिंथेटिक’ कपडे धुताना त्यातून निघणारे अतिसूक्ष्म तंतू जलस्त्रोतात जाऊन अडकतात. त्यामुळे पाणी प्रदूषित होते. वातावरणात प्रवेश करणाऱ्या अतिसूक्ष्म तंतूंच्या प्राथमिक स्त्रोतांमध्ये घरगुती कपडे धुण्याचे ठिकाण, कापड, टायर उद्योग, पाळीव प्राण्यांच्या बाटल्या, मासेमारीचे जाळे आदींचा समावेश आहे. कपडे धुण्याच्या मशीनमधून अतिसूक्ष्म तंतू वेगळे करणारे तंत्रज्ञान जागतिक स्तरावर विकसित केले जात असून ते आता उपलब्ध होत आहे. भारतात मात्र अजूनही या दिशेने फारसे प्रयत्न झाले नाहीत. फ्रान्स आणि अमेरिकेसारख्या देशांनी कपडे तयार करणाऱ्या कंपन्यांना ‘सिंथेटिक’ कपडे आणि अतिसूक्ष्म तंतूबाबत उल्लेख करणे अनिवार्य केले आहे. येणाऱ्या प्लास्टिक करारात अतिसूक्ष्म प्लास्टिक प्रदूषणाच्या या स्वरूपावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

अतिसूक्ष्म तंतूच्या प्रदूषणामुळे पर्यावरण, मानवी आरोग्यावर लक्षणीय परिणाम होतो. हे कण शरीरात गेल्यास रोगप्रतिकारक शक्ती तसेच मज्जासंस्थेवर त्याचा परिणाम होऊ शकतो. घरातील कपडे धुण्याच्या यंत्रामध्ये अतिसूक्ष्म तंतू वेगळे करणारी कोणतीही यंत्रणा नसते. त्यामुळे सांडपाण्याच्या माध्यमातून ते नद्या आणि महासागरापर्यंत पोहोचतात.

प्रीतीबंथिया महेश, मुख्य कार्यक्रम समन्वयक, ‘टॉक्सिक्स लिंक’.

अतिसूक्ष्म प्लास्टिकच्या प्रदूषणावर सखोल संशोधन होणे आवश्यक आहे. देशात निसर्गावर आधारित उद्योजकतेला चालना देण्यासाठी नैसर्गिक टिकाऊ व पर्यावरणपूरक पर्याय वापरले पाहिजे.

सतीश सिन्हा, सहयोगी संचालक, ‘टॉक्सिक्स लिंक’.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Synthetic fabric clothes cause huge increase in micro fiber pollution zws
Show comments