समिती पांढरकवडय़ात दाखल

पांढरकवडय़ातील टी-१ वाघिणीच्या मृत्यूसंदर्भात केंद्राने स्थापन केलेली राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन समितीची दोन सदस्यीय चमू मंगळवारी, पांढरकवडा येथे पोहोचली. समितीने मंगळवारी दिवसभर वाघिणीच्या मृत्यूसमयी जिप्सीत उपस्थित चमूतील सर्व सदस्यांची चौकशी केली. उद्या, बुधवापर्यंत या समितीचे चौकशीसत्र सुरू राहणार असून समितीतील सदस्यांनी यासंदर्भात बोलण्यास नकार दिला.

वाघिणीच्या मृत्यूसंदर्भात दावे-प्रतिदावे केले असताना चौकशीसाठी दोन समित्या स्थापन करण्यात आल्या. यात केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन खात्याअंतर्गत राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने दोन सदस्यीय समिती गठित केली. या समितीत सेवानिवृत्त अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक ओ.पी. कालेर आणि वाईल्डलाईफ कंट्रोल डिव्हिजन आणि कम्युनिकेशन तसेच वाईल्डलाईफ ट्रस्ट ऑफ इंडियाचे उपसंचालक व प्रमुख जोस लुईस यांचा समावेश आहे. तसेच समन्वयक म्हणून राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण नागपूर कार्यालयाचे उपमहासंचालक हेमंत कामडी यांचा समावेश आहे.

मंगळवारी सकाळी दहा वाजता ही समिती पांढरकवडा येथे पोहोचली. समिती येणार म्हणून नेमबाज नवाब शफात अली आणि वाघिणीला गोळ्या घालून ठार करणारा त्याचा मुलगा असगर हे दोघेही सोमवारी रात्रीच पांढरकवडा येथे पोहोचले. या समितीने वाघिणीच्या मृत्यूसमयी जिप्सीत सहभागी असणाऱ्या प्रत्येकाची स्वतंत्रपणे व वाघिणीच्या मृत्यूस्थळावर नेऊन चौकशी केली. या संपूर्ण चौकशी सत्राचे चित्रीकरण देखील केले जात आहे.

चौकशी सुरू करण्यापूर्वी या सर्वाना बेसकॅम्पवर बोलावण्यात आले. या चमूसोबत मोहिमेत सहभागी डॉ. चेतन, डॉ. अंकुश व डॉ. कडू हे देखील सोबत होते. उद्या, समितीतील सदस्य डॉक्टरांशी देखील बोलणार आहेत. मात्र, या समितीत एकाही पशुवैद्यक आणि जीवशास्त्रज्ञाचा समावेश नाही. यासंदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता कुणीही या चौकशीसंदर्भात अधिक माहिती देण्यास नकार दिला. ही समिती २६ नोव्हेंबरला त्यांचा अहवाल केंद्र सरकारला सोपवणार आहे.

दरम्यान, राज्य सरकारने देखील उत्पादन व व्यवस्थापन विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. शेषराव पाटील, वाईल्डलाईफ ट्रस्ट ऑफ इंडियाचे डॉ. अनिस अंधेरिया, अर्थसंकल्प, नियोजन व विकास विभागाचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर तसेच देहरादूनच्या भारतीय वन्यजीव संस्थेचे संशोधक डॉ. बिलाल हबीब यांची एक समिती  स्थापन केली आहे.