गोंदिया : जिल्ह्यातील नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील भटकंती करत टी-१ वाघीण गेल्या दोन महिन्यांपासून वनविभागाच्या पथकाला त्रासदायक ठरत आहे. गेल्या दोन दिवसांपासून या वाघिणीमुळे आमगाव-सालेकसा तालुक्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या आठवड्यात गोंदिया तालुक्यातील रावणवाडी चांगेरा परिसरात घुसलेल्या वाघिणीने पुन्हा मार्ग बदलला. ती कामठा मार्गे आमगाव आणि आता सालेकसा तालुक्याकडे जात असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इथूनच मध्यप्रदेशातील जंगल परिसराला सुरुवात होत असल्यामुळे तिचे मार्गक्रमण बघता तिची पुढील वाटचाल मध्यप्रदेशच्या दिशेने होत असल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे. गेल्या दोन दिवसांपासून आमगाव व सालेकसा तालुक्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी वन परिक्षेत्रातून आणलेल्या दोन वाघिणींना २० मे रोजी नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात गोंदियाचे पालकमंत्री सुधीर मुंगट्टीवार यांच्या हस्ते सोडण्यात आले होते. सोडल्याचा आठ-दहा दिवसांनंतर नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातून या दोन वाघिणींपैकी एक वाघीण भरकटली. ही वाघीन अर्जुनी मार्गे गोरेगाव तालुक्यातील पिंडकेपार, हिरडामाळी परिसरात घुसली. यानंतर वाघिणीने गोंदिया तहसीलकडे मोर्चा वळवला, सुमारे दीड महिना गोंदिया तहसीलच्या पांगडी जलाशय परिसरात मुक्काम केला. यानंतर ही वाघीण भटकंती करत रावणवाडी चांगेरा परिसरातील राजा-राणी वनपरिक्षेत्रात घुसली. त्यामुळे वनविभागाचे पथक रावणवाडी व चांगेरा परिसरात तळ ठोकून होते.

हेही वाचा – “आम्हाला केवळ तारीख पे तारीख..”, शिंदे गटाच्या आमदारांची प्रतिक्रिया, काय म्हणाले?

७ जुलै रोजी दुपारी ३:३० च्या सुमारास ही वाघीण हा परिसर सोडून कामठा (आमगाव) आणि घाट्टेमणी भागात गेली. या वाघिणीला जीपीएस टॅगिंग लावण्यात आले आहे. या वाघिणीचे ठिकाण कामठा-घाट्टेमणी (सालेकसा) परिसरात असल्याचेही वनविभागाच्या पथकाने सांगितले आहे. सध्या या परिसरात टी- १ वाघिणीचे वावर असल्याने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी गावकऱ्यांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला असून रात्री एकटे बाहेर पडू नये, असे आवाहनही केले आहे. पण ८ जुलै रोजी आमगाव तालुक्यातून ही वाघिणी सालेकसा तालुक्यात दाखल झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आमगाव व सालेकसा तालुक्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या वाघिणीच्या मागावर वनविभागाचे चार पथक निगराणी राखायला ठेवण्यात आले आहे.

हेही वाचा – नागपूर : राष्ट्रवादीच्या कार्यालयातून जयंत पाटील, सुप्रिया सुळे, अनिल देशमुख यांचे छायाचित्र काढले

नागरिकांनो सावधान..

रावणवाडी, कामठा परिसर येथून वाघिणी आमगाव तहसीलमध्ये पोहोचली होती. मात्र आज रविवार ९ जुलै रोजी सालेकसा तहसीलमध्ये वाघिणीचा धुमाकूळ सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. आमगाव – सालेकसा तालुक्यातील नागरिकांनी रात्रीच्या वेळी एकटे बाहेर पडू नये, शेतीच्या कामासाठी जातानासुद्धा तीन चारच्या संख्येत सोबत जावे, हातात काठी घेऊन जावे, वाघीण दिसल्यास आरडाओरड करू नये, शौचास बाहेर जाऊ नये, सतर्क राहावे, असे आवाहन सहायक उपवनसंरक्षक राजेंद्र सद्गिर यांनी लोकसत्तासोबत बोलताना केले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: T1 tigress moves towards madhya pradesh terror in amgaon salekasa taluka sar 75 ssb
Show comments