नागपूर : विकासाचा झंझावात आता जंगलात जाऊन पोहोचलाय आणि या विकासात वन्यजीवांचा अधिवास नाहीसा होत आहे. त्यामुळे आपला अधिवास वाचवण्यासाठी वाघाने चक्क जंगलातच ‘चिपको’ आंदोलन सुरू केले आहे. वन्यजीवप्रेमी व छायाचित्रकार इंद्रजित मडावी यांनी चित्रित केलेला व्हिडीओतून असेच काहीसे चित्र दिसून येत आहे.
पर्यावरण संरक्षणाशिवाय विकास टीकत नाही, म्हणजेच सध्याच्या काळात नैसर्गिक संसाधनांचा वापर भविष्यातील पिढ्यांच्या गरजा लक्षात घेऊन कसा केला पाहिजे. ज्यामुळे आर्थिक विकास आणि पर्यावरण संरक्षण यांच्यात इच्छित संतुलन स्थापित केले जाऊ शकेल. शाश्वत विकासामध्ये आपण मनुष्याच्या विकासासाठी निसर्गाचा अशाप्रकारे वापर केला पाहिजे की पर्यावरणाला हानी पोहोचू नये. निसर्ग आणि विकासामध्ये संतुलन राखू शकेल, असा शाश्वत विकास करायला हवा. मात्र, सध्या याच्या उलटच सुरू आहे. आतापर्यंत जंगलाच्या बाहेर असणाऱ्या प्रकल्पांनी जंगलात शिरकाव केला आहे. त्यामुळे बिचाऱ्या प्राण्यांना बाहेर धाव घ्यावी लागत आहे. अशावेळी मानव-वन्यजीव संघर्ष उद्भवला तर थेट त्यांनाच उचलून पिंजऱ्याआड केले जात आहे. अशावेळी या वन्यजीवांनी करायचे तर काय? त्यांनी त्यांच्या अधिवासासाठी लढा लढायचा का? की आंदोलन करायचे? अधिवासासाठी आंदोलनच करायचे तर ‘चिपको’ आंदोलनाचा प्रकार त्यांनी अवलंबल्याचे दिसतेय.
हेही वाचा : Sanjay Gaikwad: शिंदे सेनेचा आमदार म्हणतो, “तलवारीने केक कापणे गुन्हा नव्हे!”
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील अलीझंजा बफरमधील ‘चांदणी’ या वाघिणीचा समोर आलेला व्हिडीओ जणू असेच काही दर्शवत आहे. वन्यजीवप्रेमी व छायाचित्रकार इंद्रजित मडावी यांनी हा व्हिडीओ चित्रित केला आहे. यात ‘छोटा मटका’ हा वाघ आणि ‘झरणी’ या वाघिणीचे अपत्य असलेल्या ‘चांदणी’ने झाडाला कवटाळले आहे. जणू ती हेच सांगते आहे की विकास करा, पण आमचा अधिवास हिरावू नका. ही वाघीण आधी झाडाला कवटाळत आहे आणि नंतर त्याच झाडाच्या भोवताल घुटमळताना दिसून येत आहे. चिपको आंदोलन ही भारतातील एक महत्त्वपूर्ण पर्यावरणीय चळवळ आहे.
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील अलीझंजा बफरमधील ‘चांदणी’ या वाघिणीचा व्हिडीओ समोर आला आहे. वन्यजीवप्रेमी व छायाचित्रकार इंद्रजित मडावी यांनी हा व्हिडीओ चित्रित केला आहे. pic.twitter.com/rt0MPakrS8
— LoksattaLive (@LoksattaLive) August 17, 2024
या आंदोलनाचे उद्दिष्ट जंगलतोड थांबवणे आणि पर्यावरणाचे संरक्षण करणे होते. हे आंदोलन १९७० च्या दशकात उत्तराखंड (त्या वेळी उत्तर प्रदेश) राज्यातील हिमालयाच्या पर्वतरांगा परिसरात सुरू झाले. चिपको आंदोलन हे झाडांना वाचविण्यासाठी झालेले आंदोलन होते. तत्पूर्वी झाडांना वाचवण्यासाठी इ. स. १७३० साली राजस्थानातल्या बिश्नोई लोकांनी प्राण्यांचे बलिदान दिले. त्यानंतरही भारतात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरूच आहे. ही वृक्षतोड आता जंगलापर्यंत जाऊन पोहोचली आहे. त्यामुळे या व्हिडीओत देखील वाघ जणू झाडांना वाचवण्याचा संदेश देत असल्याचे दिसून येत आहे.