नागपूर : ‘‘अजीम-ओ-शान शहंशाह, फरवा रवा.. हमेशा हमेशा सलामत रहे, तेरा हो क्या बयां.. तू शान-ऐ-हिंदुस्तान, हिंदुस्तान तेरी जान, तू जान-ऐ-हिंदुस्तान..’’ ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील या वाघाची चाल काहीशी अशीच आहे. ‘छोटा दडियल’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या वाघाचा ताडोबात दरारा आहे आणि त्यानेच पर्यटकांना देखील त्याच्या मागेमागे फिरायला लावले. हा प्रसंग चित्रीत केला आहे वन्यजीव छायाचित्रकार अरविंद बंडा यांनी. याआधीही त्यांनी ताडोबातील वाघांच्या अप्रतिम चित्रफिती तयार केल्या आहेत.
अवघ्या पाच वर्षांचा ‘छोटा दडीयल’ अतिशय देखणा आहे, त्याच्या चेहऱ्याभोवती असलेल्या दाढीसारख्या दिसणाऱ्या केसांमुळे त्याच्या सौंदर्यात भर पडली आहे. पण, त्याचबरोबर त्याचा रुद्रावतार देखील पर्यटकांनी अनुभवला आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील सिरकडा बफर क्षेत्रात ‘पाटलीनबाई’ नावाची वाघीण आणि ‘दडीयल’ यांचा बछडा असलेला ‘छोटा दडीयल’ २०१९ मध्ये जन्माला आला. पळसगावमार्गे मोहर्लीच्या जंगलामध्ये साधारणतः दोन वर्षांपूर्वी त्याने आपला अधिवास तयार केला. सुरुवातीच्या काळात त्याला ‘भीम’ या नावाने ओळखले जात होते. मात्र, ‘दडीयल’प्रमाणे त्याला गळ्याभोवती व मानेभोवती केस (दाढी) येऊ लागले. यावरून त्याचे नामकरण ‘छोटा दढीयल’ असे झाले. सुरुवातीला अधिवासासाठी त्याची ‘बजरंग’ या वाघासोबत लढाई झाली. ‘छोटा दडीयल’ने त्याला या लढाईत हरवले. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील खातोडापासून मोहर्लीतील तेलिया, जामुनझोरा या भागावर ‘छोटा दढीयल’ने त्याचे साम्राज्य निर्माण केले.
हेही वाचा : महाकुंभ २०२५! ‘एक थाळी एक थैली’ आणि ‘ समयदानी ‘ उपक्रम
मोहर्ली गावाच्या जवळच असणाऱ्या तलावाच्या परिसरातील अनेकदा पर्यटकांना ‘छोटा दडीयल’ ने त्याच्या करामती दाखवल्या आहेत. पर्यटकांना त्याने कधी निराश केले नाही. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील दक्षिणेकडे असणाऱ्या भूभागात आता ‘छोटा दढीयल’चे त्याचे साम्राज्य स्थापन केले आहे. कित्येकदा तो मोहर्लीच्या गाभा क्षेत्रात, ताडोबाकडे जाणाच्या मुख्य डांबरी रस्तावर, कोंडगाव, सितारामपेठ याठिकाणीसुद्धा दिसतो. मात्र, जुनोना बफर क्षेत्र त्याचे हक्काचे ठिकाण आहे. याच ‘छोटा दडियल’ ने ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या मोहर्ली वनक्षेत्रात पर्यटकांना दर्शन दिले. त्याने केवळ दर्शनच दिले नाही तर एखाद्या शहंशाहप्रमाणे तो जंगलातील वाटेवरुन समोरसमोर जात होता आणि प्रजेप्रमाणे पर्यटक त्याच्या मागेमागे येत होते.
‘छोटा दडियल’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या वाघाचा ताडोबात दरारा आहे आणि त्यानेच पर्यटकांना देखील त्याच्या मागेमागे फिरायला लावले. हा प्रसंग चित्रीत केला आहे वन्यजीव छायाचित्रकार अरविंद बंडा यांनी. (Video Credit – Banda Arvind) pic.twitter.com/jxWzGSpm6d
— LoksattaLive (@LoksattaLive) December 23, 2024
एरवी ताडोबा व्याघ्रप्रकल्पात पर्यटकांची वाहने वाघाच्या अगदी जवळ नेली जातात. वाहनांची गर्दी त्या वाघाच्या मागेपुढे होते, मात्र ‘छोटा दडियल’चा दराराच इतका होता, की पर्यटकांना हळूहळू त्याच्या मागे जाण्यावाचून पर्यायच राहीला नाही.