नागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील मोहर्ली प्रवेशद्वारातून आत जाण्यासाठी स्पर्धकांमध्ये चढाओढ असते. त्याला कारणही तसेच. ताडोबातील काही प्रसिद्ध वाघ याच क्षेत्रात पर्यटकांना अगदी सहजपणे दिसतात. मोहर्लीच्या याच परिसरात ‘छोटी तारा’ या वाघिणीचे वास्तव्य. तिला आणि तिच्या बछड्यांना पाहण्यासाठी तर पर्यटकांमध्ये अगदी चढाओढ असते. मात्र, त्यादिवशी पर्यटकांसमोरच या क्षेत्रात ‘त्या’ दोन भावंडांमध्ये जोरदार भांडण झाले. यावेळी वन्यजीव छायाचित्रकार अरविंद बंडा यांनी हे भांडण कॅमेऱ्यात कैद केले.
जंगलातील पर्यटनाचा हंगाम आता कुठे सुरू झाला आहे आणि पर्यटकांनी धाव घेतली आहे ती ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाकडे. कारण या जंगलातील वाघ मग ते बफर क्षेत्रातील असोत वा गाभा क्षेत्रातील, पर्यटकांना ते कधीच निराश करत नाहीत. येथील वाघांच्या, त्यांच्या बछड्यांच्या कितीतरी कथा या व्याघ्रप्रकल्पातच लिहिण्यात आल्या आहेत. ‘छोटी तारा’ ही वाघीण त्यातलीच एक. ताडोबाच्या जंगलात पहिल्यांदा जर कोणत्या वाघिणीला रेडिओ कॉलर लावण्यात आले असेल तर ती ‘छोटी तारा’ला. २०१४च्या सुमारास तिला रेडिओ कॉलर करण्यात आले. २०२० मध्ये नंतर ही कॉलर काढण्यात आली. ताडोबातील मोहर्लीचे वनक्षेत्र हा तिचा मुळ अधिवास. खरं तर ती आता उतारवयाकडे झुकली आहे, पण तिला पाहिल्यानंतर ते दिसून येत नाही. तिचा बिनधास्तपणा आजही तसाच कायम आहे. तोच गुण तिच्या बछड्यांमध्ये देखील दिसून येतो. ‘छोटी तारा’ असोत वा तिचे बछडे, ते अगदी सहजपणे पर्यटकांना सामोरे जातात. कदाचित त्यामुळेच ते अधिक प्रसिद्ध असावेत. अलीकडे तर तिचे बछडे देखील तिचीच ‘री’ ओढायला लागले आहेत. आतापर्यंत ‘छोटी तारा’ने सहावेळा बछड्यांना जन्म दिला आहे. आता सध्या तिच्यासोबत दिसून येणारे आणि प्रचंड मस्तीखोर दिसणारे तिचे बछडे म्हणजे तिच्या पोटी जन्माला येणारे कदाचित शेवटचेच.
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील मोहर्ली प्रवेशद्वाराजवळ 'छोटी तारा' या वाघिणीच्या दोन बछड्यांमध्ये चांगलीच जुंपली होती. दोन बछड्यांमधील संघर्ष पर्यटकांना अनुभवायला मिळाला. (व्हिडीओ क्रेडिट – अरविंद बंडा) pic.twitter.com/nXEH4BJIxm
— LoksattaLive (@LoksattaLive) December 2, 2024
हेही वाचा : रेल्वे रुळालगत १,२०० किलोमीटरची सुरक्षा भिंत उभारणार
छोटी ताराचे तिच्या या बछड्यांसोबतच्या अनेक ध्वनीचित्रफिती आणि छायाचित्र अलिकडे समाजमाध्यमावर येत आहेत. पर्यटकांनी भरलेली वाहने असताना देखील ‘छोटी तारा’ बिनधास्तपणे तिच्या बछड्यांसोबत रस्त्यावरुन जाताना दिसून येत आहे. यात त्यांचा रुबाबदारपणाही तेवढाच दिसून येतो. सुमारे महिनाभरापूर्वी मोहर्लीच्या गाभा क्षेत्रात तिच्या बछड्यांनी दंगामस्ती करत पर्यटकांची चांगलीच करमणूक केली होती. मात्र, यावेळी त्यांचा नूर काही वेगळाच होता. खेळता खेळता अचानक या दोन भावंडांमध्ये चांगलीच जुंपली. थोड्यावेळानंतर ते शांत झाले, पण नंतर पुन्हा त्यांच्यात भांडण सुरू झाले. आतापर्यंत मोठ्या वाघांची लढाई पर्यटकांनी पाहिली होती. येथे मात्र दोन भावंडांमध्येच जुंपली होती.