नागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प वगळता राज्यातील अभयारण्य व व्याघ्रप्रकल्पांच्या गंभीर अधिवासातील(कोर) पर्यटनाचे दरवाजे मंगळवार, एक ऑक्टोबरपासून खुले झाले आहे.ताडोबा व्याघ्रप्रकल्पातील दरवाजे मात्र एक दिवस उशिरा म्हणजे बुधवार, दोन ऑक्टोबरपासून उघडणार आहेत.राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार देशभरातील अभयारण्य आणि व्याघ्रप्रकल्पाच्या गंभीर अधिवासातील पर्यटन पावसाळ्यात तीन महिने बंद ठेवण्यात येते.
काही अभयारण्य आणि व्याघ्रप्रकल्पांमध्ये मात्र बफर क्षेत्रातील पर्यटन प्राधिकरणाच्या परवानगीने पावसाळ्यात देखील सुरू ठेवण्यात येतात. गेल्या काही वर्षात गंभीर अधिवासापेक्षाही बफर क्षेत्रात वाघांची संख्या वाढली आहे. व्याघ्रदर्शन देखील सहज होत असल्याने पर्यटकांचा ओढा या क्षेत्राकडे वाढला आहे. प्रामुख्याने ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात गंभीर अधिवासापेक्षाही बफर क्षेत्रातील वाघांनी पर्यटकांना आकर्षित केले आहे. त्यामुळे सर्वसामान्य पर्यटकच नाहीत तर ख्यातनाम व्यक्तीदेखील बफरमधील पर्यटनाला पहिली पसंती देत असल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा >>>महाविकास आघाडीची ताकद अधिक बळकट करण्याचा निर्धार
राज्यातील सहा व्याघ्रप्रकल्पांपैकी ताडोबा आणि पेंचला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक आहे. तर अभयारण्यांमध्ये टिपेश्वर, उमरेड-पवनी-कऱ्हांडला यांना भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक आहे. नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्प देखील सुरू झाले असून १५ ऑक्टोबरनंतर ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. तर एक ते १५ ऑक्टोबरपर्यंत ऑफलाईन प्रवेश देण्यात येत आहे. पेंच व्याघ्रप्रकल्पात सिल्लारी, खुरसापार, चोरबाहूली, बनेरा हे चार प्रवेशद्वार पर्यटनासाठी खुले करण्यात आले आहेत.
बोर व्याघ्रप्रकल्पात बोरधरण पर्यटन प्रवेशद्वारापासून २० किलोमीटरपर्यंतचे रस्ते सफारीसाठी खुले करण्यात आले. पावसामुळे जंगल पर्यटन बंद ठेवण्यात आले होते. मात्र, आता पावसाने उसंत घेतली पर्यटनासाठी अनुकूल वातावरण आहे. सर्वत्र हिरवळ पसरली असून पहिल्याच दिवशी गंभीर अधिवासातील पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी दिसून आली.
हेही वाचा >>>जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंत्यांचे लेखणी बंद
‘टी ६२’ वाघीण तीन बछड्यांसह कॅमेऱ्यात
पेंच व्याघ्रप्रकल्पात वाघ सहजासहजी नजरेस पडत नाही. मात्र, पावसाळी सुटीनंतर व्याघ्रप्रकल्पाच्या गंभीर अधिवासात पहिल्याच दिवशी पर्यटकांना व्याघ्रदर्शन झाले. या व्याघ्रप्रकल्पातील सिल्लारी प्रवेशद्वाराला पर्यटकांची पहिली पसंती असते. या प्रवेशद्वारातून आत जाताच ‘टी ६२’ ही वाघीण तीच्या तीन बछड्यासह दिसली. त्यामुळे पर्यटकांनी भ्रमणध्वनी, कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्यांची प्रतिमा टिपली.
पर्यटकांद्वारे आधीच नोंदणी
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाला मंगळवारी सुटी राहात असल्याने या व्याघ्रप्रकल्पाचे दरवाजे बुधवारपासून उघडण्यात येत आहे. पर्यटकांचा ओढा बफर क्षेत्राकडे वाढला आहे. तरीही पावसाळी सुटीनंतर गंभीर अधिवासातील पर्यटन सुरू होत असल्याने पर्यटकांनी त्यासाठी आधीच नोंदणी केली.