नागपूर : महाराष्ट्रातील ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात यापूर्वी वाघ पाहण्यासाठी उन्हाळ्यात पर्यटकांची प्रचंड गर्दी होत होती. आता ताडोबातील वाघ बाराही महिने दिसतात आणि म्हणूनच बाराही महिने ताडोबात पर्यटकांची मांदियाळी दिसते. गाभा क्षेत्रच नाही तर बफर क्षेत्रसुद्धा पर्यटकांना वाघ निराश करत नाही. अलीकडेच ताडोबा व्याघ्रप्रकल्पातील ‘बिजली’ नावाच्या वाघिणीचा तिच्या तिन बछड्यासहीत अतिशय सुंदर असा व्हिडीओ पर्यटक मार्गदर्शक बापू गावतुरे यांनी टिपला आहे.

हेही वाचा : काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारसभेत नितीन गडकरींचे कौतुक; नागपुरातील उद्धव ठाकरे गटाचे…

‘बिजली’ ही ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील प्रसिद्ध वाघीण आहे. ‘छोटी तारा’ आणि ‘रुद्रा’ हे तिचे आई-वडील. २०२० मध्ये तिचा जन्म झाला. ‘बिजली’ आणि ‘रोमा’ या दोन बहिणीच. २०२२ मध्ये याच ‘बिजली’ वाघिणीने पहिल्यांदा दोन बछड्यांना जन्म दिला. तिच्या आईच्या म्हणजेच ‘छोटी तारा’च्या क्षेत्रातच तिचाही अधिवास आहे. कोसेकनाल रस्ता, जामनी तलावाचा काही भाग तसेच कोलारा बफर क्षेत्रातही तिचा दबदबा आहे. जामनी तलावामधील एका पाणथळ जागेवर तिने आपले अधिकारक्षेत्र स्थापित केले आहे. रामपूर नाल्यापासून तर जामनी तलावापर्यंत आणि कोलारा बफर क्षेत्रापर्यंत ती फिरत असते. ‘बिजली’ वाघिणीच्या बाबतीत अनेक गोष्टी आश्चर्यकारक आहेत. तिची आई ‘छोटी तारा’ आणि तीने अवघ्या दोन-चार महिन्याच्या अंतराने बछड्यांना जन्म दिला. साधारणपणे एकाचवेळी आई आणि मुलगी या दोघींनाही मातृत्त्वाची अनुभूती आली. ही कथा एवढ्यावरच संपली नाही. एकीकडे तिच्या आईचे म्हणजेच ‘छोटी तारा’चा एक बछडा बेपत्ता झाला. तर काही कालावधीनंतर बिजलीच्या दोन बछड्यांपैकी एक बछडा देखील बेपत्ता झाला. आई आणि मुलगी दोघींनीही आपआपल्या बछड्यांना शोधण्याचा खूप प्रयत्न केला.

काही दिवसांनी ‘छोटी तारा’चा बेपत्ता असलेला बछडा ‘बिजली’ या वाघिणीसोबत दिसू लागला. तर ‘बिजली’चा बछडा अखेरपर्यंत दिसलाच नाही. ‘बिजली’ने तिच्या एका बछड्यासह आपल्या आईच्या म्हणजेच ‘छोटी तारा’ या वाघिणीच्या एका बछड्याचेही पालनपोषण केले. वाघांच्या बाबतीत घडलेली ही कदाचित एकमेव घटना असावी. दरम्यान, पर्यटकांनीच आता ‘छोटी तारा’च्या बछड्याला ‘मामा’ तर ‘बिजली’च्या बछड्याला ‘भांजा’ असे नाव दिले आहे. ताडोबा व्याघ्रप्रकल्पात हे दोघेही बरेचदा एकत्र फिरताना दिसतात आणि ‘मामा-भांजा’ म्हणूनच ते प्रसिद्ध आहेत. कोलारा प्रवेशद्वाराजवळच ‘बिजली’ ही वाघीण अनेकदा पर्यटकांना दिसून येते. आता तर ती तिच्या तीन बछड्यांसोबत पर्यटकांना दिसून येत आहे.ती समोर आणि मस्ती करत येणारे, तिच्याच स्टाईलमध्ये चालणारे तिचे तिन्ही बछडे तिच्या मागेमागे, असे चित्र ताडोबात आहे.