नागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात क्षमतेपेक्षा अधिक वाघ आहेत. त्यातच आता पर्यटनाचा भार वाढत चालल्याने वाघ चक्क जंगलाबाहेर यायला लागले आहेत. ताडोबालगत चंद्रपूर-मूल राष्ट्रीय महामार्गावर तीन बछड्यासहत वाघीण रस्ता ओलांडत असताना भरधाव येणाऱ्या आणि वाघीण दिसताच थांबलेल्या वाहनांमुळे वाघीण आणि बछड्यांची ताटातूट झाली. संतप्त झालेल्या वाघिणीने या वाहनांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. वन्यजीवप्रेमींनी परिस्थिती हाताळली आणि वाघिणीला तिच्या बछड्यांना सुरक्षित नेता आले. या मार्गावर अनेक वर्षांपासून उपशमन योजना प्रस्तावित आहेत. मात्र, निधी नाही, असे सांगत टाळाटाळ केली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यातील सर्वाधिक वाघ ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात आहेत. या व्याघ्रप्रकल्पांकडे पर्यटकांचा ओढाही अधिक आहे. गेल्या काही वर्षात संरक्षित क्षेत्राबरोबरच प्रादेशिक, वनविकास महामंडळ तसेच जंगलालगतच्या रस्त्यांवरही वाघांचे वास्तव्य आढळून येत आहे. चंद्रपूर-मूल हा राष्ट्रीय महामार्ग क्र. ९३० आहे. या महामार्गाला लागूनच एका बाजूला ताडोबाचे बफर क्षेत्र तर दुसऱ्या बाजूला प्रादेशिक क्षेत्र आहे. केसलाघाट हे नवे पर्यटन प्रवेशद्वार देखील या महामार्गालगत आहे. त्यामुळे या महामार्गावरुन वाघच नाही तर इतरही वन्यप्राणी रस्ता ओलांडतात. दोन दिवसांपूर्वी या महामार्गावरुन वाघीण आणि तिचे तीन बछडे रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत होते. वाघिणीने रस्ता ओलांडला, पण भरधाव येणाऱ्या वाहनांमुळे तिच्या बछड्यांना रस्ता ओलांडता आला नाही. त्यामुळे ही वाघीण रस्त्याच्या कडेलाच बसून राहिली. वाघीण दिसताच वाहने थांबायला लागली. वन्यजीव अभ्यासक सरोश लोधी यांना हे दिसताच त्यांनी थांबलेल्या वाहनचालकांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला. इकडे बछडे दुसऱ्या बाजूला असल्यामुळे चिडलेल्या वाघिणीने वाहनांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा : वीर सुपुत्राला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप; शहीद प्रवीण जंजाळ यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

दरम्यान, सरोश लोधी यांनी या सर्व वाहनधारकांना वाहने समोर नेण्यास सांगितले. त्यानंतर बछड्यांनी रस्ता ओलांडला आणि वाघीण बछड्यांना घेऊन जंगलाच्या आत निघून गेली. या महामार्गावर वाईल्डलाइफ कन्झर्वेशन ट्रस्ट या संस्थेने उपाययोजना सुचवल्या होत्या. त्यात १५ ते १७ भूयारी मार्गांचा समावेश होता. मात्र, अजूनपर्यंत त्यावर कोणतेही काम झालेले नाही. आतापर्यंत या महामार्गावर वाघ, बिबट आणि तृणभक्षी प्राण्यांचे वाहनांखाली येऊन मृत्यू झाले आहेत. बफर आणि प्रादेशिक असे दोन्ही क्षेत्र असल्याने ‘क्षेत्र कुणाचे’ यावरुन वाद सुरू असतात. त्यामुळे गस्त देखील होत नाही. ताडोबा जंगलालगतचा हाच एक रस्ता नाही तर पदमापूर-मोहर्ली, चिमूर-वरोरा या मार्गांवर देखील नेहमी वन्यप्राणी रस्त्यावर येतात आणि भरधाव जाणाऱ्या वाहनांमुळे त्यांचा मृत्यू होतो. त्यामुळे याठिकाणी ठोस उपशमन योजना करण्याची मागणी केली जात आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tadoba andhari tiger reserve tigress on road with her cubs viral video rgc 76 css
Show comments