नागपूर : वाघ समोर आला तर भल्याभल्याची भंबेरी उडते. माणसं तर सोडाच पण जंगलातले सारेच प्राणी त्याची चाहूल लागली तरी जंगलात बेपत्ता होतात. मात्र, ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात वन्यप्राण्यांचे वेगवेगळे किस्से पाहायला मिळतात. त्यातलाच एक म्हणजे एका अस्वलाने चक्क वाघाच्या समोर जाऊन त्याला आव्हान दिले आणि एवढेच काय तर त्या वाघाला पळवून देखील लावले.
पर्यटक मार्गदर्शक बापू गावतुरे यांनी हा अप्रतिम व्हिडिओ टिपला आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात सध्या पर्यटकांची प्रचंड गर्दी आहे. या व्याघ्रप्रकल्पातील वन्यप्राणीदेखील त्यांना निराश होऊ न देता काही ना काही आठवणी त्यांना देत आहेत. दोन दिवसांपूर्वी ताडोबा व्याघ्रप्रकल्पातील गाभा क्षेत्रातील मोहर्ली प्रवेशद्वाराजवळ असाच एक आठवणीत राहील असा प्रसंग पर्यटकाना जंगलाची माहिती करून देणाऱ्या पर्यटक मार्गदर्शक बापू गावतुरे यांनी चित्रित केला.
हेही वाचा : राज्यात उकाडा वाढला; उष्माघाताचे ८२ रुग्ण
या व्हिडिओत वाघ आणि अस्वल समोरासमोर आले आहेत. या प्रसंगात सुरुवातीला वाघ अस्वलावर हल्ला करून त्याची शिकार सहजपणे करेल असे वाटते. मात्र, तसे काहीच घडत नाही. याउलट अस्वलाचा रोष पाहून वाघ घाबरला आहे. एवढेच काय तर अस्वलाचा सामना करणे कठीण गेल्याने वाघाने तेथून पळ काढला आहे.
ताडोबाच्या जंगलातील हे दुर्मिळ दृश्य बापू गावतुरे नावाच्या पर्यटक मार्गदर्शकाने आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.