नागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील ‘ती’ वाघीण वृद्धत्वाकडे झुकलीय, पण तरीही तिने सहावेळा मातृत्त्वाचा अनुभव घेतला आहे. आताही ती तिच्या बछड्यांसह जंगलात फिरताना दिसत आहे. मात्र, तिच्या रखडलेल्या चालीने पर्यटकांना काळजीत टाकले आहे. अलीकडेच ती जंगलात लंगडताना दिसून आली. तिच्या पायावर आणि कपाळावर जखमा आढळून आल्या. बऱ्याच दिवसात तिला शिकार देखील मिळालेली नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तिच्याबाबतीतली चिंता वाढली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वन्यजीव छायाचित्रकार अभिषेक सिंह यांनी तिला कॅमेऱ्यात कैद केले. राज्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील प्रत्येकच वाघाने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. ‘छोटी तारा’ ही त्यापैकीच एक वाघीण. या व्याघ्रप्रकल्पात पहिल्यांदा जर कोणत्या वाघाला ‘रेडिओ कॉलर’ लावली असेल तर ती याच वाघिणीला.

हेही वाचा – मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर फडणवीस यांचा पहिला नागपूर दौरा ठरला, स्वागताची जय्यत तयारी

आतापर्यंत सहावेळा तीने मातृत्त्वाची अनुभूती घेतली आहे. ताडोबातील मोहर्लीचे वनक्षेत्र हा तिचा मुळ अधिवास. ‘येडा अण्णा’ नावाचा नर वाघ आणि ‘तारा’ नावाच्या वाघिणीच्या पोटी ‘छोटी तारा’चा जन्म झाला. यावेळी ‘तारा’ या वाघिणीला चार पिल्ले होती. हे कुटुंब त्यावेळेस ‘सर्किट गॅंग’ या नावाने ओळखले जात होते. तशीच ओळख आता “छोटी तारा” ने निर्माण केली आहे. अनेक वर्षांपासून ताडोबाच्या जंगलात ‘छोटी तारा’ आपले अस्तित्व दर्शवत आहेत.

‘छोटी तारा’ ही सर्वात ज्येष्ठ वाघीण असून आतापर्यंत तिने कित्येक छाव्यांना जन्म घातलेला आहे आणि त्यांचे व्यवस्थित संगोपनसुद्धा केलेले आहे. मात्र, ती आता उतारवयाकडे झुकली आहे आणि आतापर्यंत न जाणवणारे वृद्धत्व आता दिसू लागले आहे. ती जवळजवळ १४ वर्षांची असल्याचे सांगितले जाते. या वयातही तीने दोन बछड्यांना जन्म दिला. दोन दिवसांपूर्वी ती पर्यटकांना लंगडताना आढळून आली. तिच्या पायावर आणि कपाळावर मार असल्याचे जखम दिसत आहेत. तिच्या चालण्यामध्येसुद्धा फरक आलेला आहे. कदाचित या मुळेच खूप दिवसांपासून शिकार केली नसल्यामुळे तिचे पोट आतमध्ये गेले असून ती उपाशी दिसत आहे. मात्र, असे असूनही तिचे छावे रस्त्यावर मस्ती करीत होते.

हेही वाचा – विदर्भातील हिरवी मिरची थेट दुबईच्या बाजारात

‘छोटी तारा’ आणि तिच्या बछड्यांची ध्वनीचित्रफित वन्यजीव छायाचित्रकार अभिषेक सिंह यांनी तयार केली. वृद्धत्वाकडे झुकल्यानंतर साधारणपणे वाघाला शिकार करणे कठीण होते. अशावेळी इतर वाघांनी केलेली शिकार बळकावण्याचा ते प्रयत्न करतात. यादरम्यान त्यांची त्या वाघाशी झुंजही होते आणि यात ते जखमी होतात. ‘छोटी तारा’बाबतही असेच काहीसे झाले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tadoba chhoti tara tiger calf video rgc 76 ssb