नागपूर : ताडोबाची खरी राणी कोण ? असा प्रश्न जर कुणी विचारलाच तर समोर नाव येतं ते “छोटी तारा” या वाघिणीचे. ताडोबात पहिल्यांदा रेडिओ कॉलर कोणत्या वाघिणीला लावली असेल तर ती “छोटी तारा” या वाघिणीला. आपल्या बछड्यांसोबत ती नेहमीच धमाल करत असते. मोठे होत असलेले तिचे बछडेदेखील तिच्याच वळणावर गेले आहेत. ताडोबात सतत ते हुंदडत असतात आणि अलीकडेच या भावंडांचा एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. वन्यजीव छायाचित्रकार व अभ्यासक दीप काठीकर यांनी हा व्हिडिओ चित्रित केला आहे.
पांढरपौनी हे ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील प्रसिद्ध क्षेत्र. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ताडोबा वनपरिक्षेत्रातील पांढरपवनीच्या या परिसराला प्रत्येक पर्यटक भेट देतोच. मुबलक पाणी, गवती कुरण आणि चितळ, सांबर, रानडुक्कर या तृणभक्षी प्राण्यांची उत्तम संख्या येथे असल्याने पर्यटकांचा हा आवडता परिसर आहे. कारण याठिकाणी वाघ देखील सहज दिसतात. त्यामुळे वाघच नाही तर साहजिकच या परिसरात राहणारे सर्वच प्राणी हे पर्यटकांकडून कॅमेऱ्याद्वारे सर्वाधिक टिपलेही जातात. या क्षेत्रातील राहणाऱ्या वाघांनाही त्यामुळे सर्वाधिक प्रसिद्धी मिळते. आणि एवढेच नाही तर येथील वाघदेखील पर्यटकांना सरावले आहेत.
हेही वाचा – नागपूर: मंगळवार ठरला घातवार, तीन अपघातात चार ठार
“माया” या वाघिणीनेसुद्धा दशकाहून अधिक काळ या व्याघ्रप्रकल्पात घालवला आहे. पांढरपवनीच्या जंगलावर या वाघिणीचा एकछत्री अंमल होता असे म्हणले तर वावगे ठरणार नाही. आता त्याच परिसरात “छोटी तारा” आणि तिचे बछडे राज्य करताना दिसून येत आहेत. “छोटी तारा” आणि तिच्या खेळकर बछड्यांनी पर्यटकांना चांगलाच लळा लावला आहे. कधी ते आपल्या आईसोबत तर कधी एकटेच खेळताना दिसून येतात. पांढरपवनीतील हा व्हिडिओ त्याचीच साक्ष देणारा आहे.
ताडोबातील छोटी तारा या वाघिणीचे बछडे सतत हुंदडत असतात. अलीकडेच या भावंडांचा एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. वन्यजीव छायाचित्रकार व अभ्यासक दीप काठीकर यांनी हा व्हिडिओ चित्रित केला आहे. pic.twitter.com/7vCB3P7ROf
— LoksattaLive (@LoksattaLive) November 27, 2024
पावसाळा अलीकडेच संपल्यानंतर सगळीकडे गवत वाढले आहे. या वाढलेल्या गवतावर सकाळच्या प्रहरी सूर्याची किरणे पडल्यानंतर गवताचे पातेही सोनेरी दिसू लागतात. हेच कोवळे उन्ह अंगावर झेलत त्या सोनेरी दिसणाऱ्या गवताच्या पात्यांमधून हे बछडे दंगामस्ती करत आहेत. तरीही आई ही शेवटी आईच असते असे म्हणतात ना तसाच काहीसा प्रत्यय येथेही आला. आपले बछडे खेळत तर आहेत, पण त्यांना काही धोका तर नाही ना हे पाहून “छोटी तारा” त्या गवताच्या पात्यांमधून बाहेर आली. तिने आजूबाजूला कानोसा घेतला आणि लगेच ते बछडे तिच्या मागोमाग आले आणि लाडीवाळपणे तिच्या जवळजवळ करू लागले. मग तिनेही जिभेने चाटत बछड्याना गोंजारले. “छोटी तारा” आणि तिच्या बछड्यासाठी हे नेहमीचेच असले तरीही पर्यटकांसाठी हे दृष्य म्हणजे पर्वणीच होती. ताडोबातील “नयनतारा” या वाघिणीला चित्रित करून आंतरराष्ट्रीय पातळीवर पुरस्कार पटकावणाऱ्या दीप काठीकर यांनी हे दृष्य चित्रित केले आहे.