नागपूर : विविध क्षेत्रातील ‘सेलिब्रिटी’ जिच्या दर्शनासाठी आसुसतात, तिचे दर्शन झाले नाही तर दोन-दोन दिवस मुक्काम ठोकतात आणि तिचे दर्शन झाल्यानंतरच ते परतीच्या प्रवासाला लागतात. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील मदनापूर बफर क्षेत्राची ही राणी म्हणजे ‘जुनाबाई’. एकदा, दोनदा नाही तर पाचवेळी तिने मातृत्त्वाचा अनुभव घेतला आणि १७ पेक्षा अधिक बछड्यांना तिने जन्म दिला. सुमारे नऊ वर्षांची ही ‘जुनाबाई’ कुणा ‘सेलिब्रिटी’पेक्षा कमी नाही. अलीकडेच ती मदनापूर या तिच्या हक्काच्या अधिवासात तिच्या बछड्यांसह निवांत पहूडलेली दिसून आली.
‘जुनाबाई’चा दरारा देखील तेवढाच आणि म्हणूनच तिचे बछडेसुद्धा बिनधास्तपणे तिच्या आजूबाजूला खेळत होते. मध्येच खेळताखेळता तिच्या अंगावर येत स्वत:चे लाड करुन घेत होते. तीसुद्धा तेवढ्याच प्रेमाने त्यांचे लाड करतानाची चित्रफित वन्यजीव छायाचित्रकार अमित खापरे यांनी तयार केली. वाघाचे एकत्र कुटुंब दर्शन तसे दुर्मिळ, पण ‘जुनाबाई’ ही वाघीण पर्यटकांना कायम तिच्या बछड्यांसह दर्शन देते. ‘जुनाबाई’ला सुरुवातीपासून पाहणारे सांगतात की ती आतापर्यंत पाचवेळा आई झाली आणि १७ बछड्यांची ती आई आहे. ‘जुनाबाई’चा दरारा देखील तेवढाच.
जंगली कुत्र्यांनी एकदा या वाघिणीचा पाठलाग करत तिची शिकार पळवण्याचा प्रयत्न केला. सुमारे २० कुत्र्यांच्या टोळक्याने सुरुवातीला तिला हैराण केले. नंतर मात्र ती या रानकुत्र्यांवर धावून येत तिचे रौद्र रूप दाखवले. ‘जुनाबाई’चा पाठलाग करणाऱ्या रानकुत्र्यांना पळता भुई थोडी झाली. सुमारे नऊ वर्षांची ‘जुनाबाई’ ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या मदनापूर बफर क्षेत्रातील ‘जुनाबाई’ मंदिराजवळ पहिल्यांदा दिसून आली. त्यानंतर सातत्याने ती ताडोबा व्याघ्रप्रकल्पात दिसायला लागली आणि पर्यटकांची लाडकी झाली.
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील मदनापूर बफर क्षेत्राची राणी म्हणजे ‘जुनाबाई’ वाघीण. पाचवेळी तिने मातृत्त्वाचा अनुभव घेतला आणि १७ पेक्षा अधिक बछड्यांना जन्म दिला. अलीकडेच ती मदनापूर या तिच्या हक्काच्या अधिवासात तिच्या बछड्यांसह निवांत पहूडलेली दिसून आली. pic.twitter.com/AeuDD3SZQz
— LoksattaLive (@LoksattaLive) June 24, 2024
अनेक ‘सेलिब्रिटी’ तिचे चाहते आहेत. अगदी ‘मास्टरब्लास्टर’ सचिन तेंडुलकरपासून तर ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा निवृत्त खेळाडू मॅथ्यू हेडनसुद्धा. सचिन तेंडुलकरने तर तब्बल दोन दिवस तिच्या दर्शनासाठी मदनापूर परिसरात मुक्काम ठोकला होता. ‘जुनाबाई’च्या तीन पिढ्यांचा तो साक्षीदार राहिला आहे. वर्षातून एकदा तरी ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाला भेट दिल्याशिवाय तेंडुलकरची व्याघ्रप्रकल्पातील सफारी पूर्ण होत नाही. या व्याघ्रप्रकल्पातील गाभा आणि बफर अशा दोन्ही क्षेत्राची भटकंती ठरलेली आहे. नावांनी ओळखल्या जाणाऱ्या आणि प्रसिद्ध अशा जवळजवळ सर्वच वाघांचे दर्शन त्याला एकदा नाही तर अनेकदा झाले आहे. ‘जुनाबाई’ ही त्यातलीच एक वाघीण. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील मदनापूर बफर क्षेत्र म्हणजे या वाघिणीचा हक्काचा अधिवास. ती मदनापूरची वाघीण असे म्हणले तरी वावगे ठरणार नाही. ‘जुनाबाई’ नावाच्या मंदिर परिसरात या वाघिणीचे वास्तव्य असल्याने वन्यजीवप्रेमींनी तिला ‘जुनाबाई’ नाव दिले व ती याच नावाने प्रसिद्ध आहे.