नागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात जिप्सीतील पर्यटक आणि वाघाचा सामना रोजच होतो, पण त्याच जंगलात दुचाकीस्वारांसमोर अचानक वाघ आला तर.. या व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्रात मोहर्ली-कोंडेगाव रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीस्वारांसमोर अचानक वाघ आला आणि साऱ्यांचाच श्वास रोखला गेला. वन्यजीव छायाचित्रकार अरविंद बंडा यांनी हे दृश्य कॅमेऱ्यात कैद केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात गाभा क्षेत्रात जेवढे वाघ आहेत तेवढेच ते बफर क्षेत्रातही आहे. त्यामुळे अलीकडच्या काही वर्षांत गाभा क्षेत्रासोबतच बफर क्षेत्रातील पर्यटनाला पर्यटकांची पसंती मिळू लागली आहे. त्याचवेळी व्याघ्रप्रकल्पाच्या बाहेरसुद्धा वाघांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष देखील वाढत आहे. गावात वाघ येणे, रस्त्यावर वाघ दिसणे या नित्याच्या घटना झाल्या आहेत. याच घटना मानव-वन्यजीव संघर्षासाठी कारणीभूत ठरत आहे. याच व्याघ्रप्रकल्पालगतच्या रस्त्यावर कित्येकदा वाहनासमोर वाघ आला आहे. मात्र, रविवारच्या सकाळी काही वेगळेच घडले.

हेही वाचा – विमानातून उतरताच बावनकुळेंचा फोन, म्हणाले….; महाजनांनी सांगितला किस्सा

बफरलगतच्या गावातील एक गावकरी दुचाकीने मोहर्ली ते कोंडेगाव या रस्त्यावरून येत होता. तर विरुद्ध बाजूने पर्यटकांचे वाहन येत होते. त्याचवेळी रस्त्यालगतच्या जंगलात वाघ दुचाकी आणि पर्यटकांचे वाहन या दोन्हीकडे पाहात होता. पर्यटकांच्या जिप्सीतील पर्यटकांनाही वाघ दिसला, मात्र दुचाकीस्वाराला याची कल्पना नव्हती. तो समोर येत असतानाच पर्यटकांनी भरलेल्या जिप्सीतील पर्यटकांनी त्या दुचाकीस्वाराला तिथेच थांबण्याचा इशारा केला. त्याचक्षणी वाघ जंगलातून रस्त्यावर आला आणि त्याने दुचाकीस्वारकडे नजर टाकली. वाघ त्याच्याकडे जातो की काय असे वाटत असतानाच क्षणार्धात वाघाने रस्ता ओलांडत दुसऱ्या बाजूचे जंगल गाठले.

हेही वाचा – आकाश फुंडकरांना आला ‘फोन’! हॅटट्रिकनंतर मिळाला ‘लाल दिवा! संजय कुटे यांना…

वाघ या दुचाकीस्वारापासून काही मीटर अंतरावर होता. काही वर्षांपूर्वी ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात दुचाकीवर जाणाऱ्या दोन वनकर्मचाऱ्यांचा मार्ग एका वाघाने रोखला. जंगलामधील एका मार्गावर वाघ बसला होता. वनकर्मचारी समोर वाघ पाहिल्यावर घाबरले. पण त्यांनी विचारपूर्वक दुचाकी थांबवली. त्यानंतर वाघ त्यांच्या दिशेने गेला. त्यावेळी कर्मचारी कमालीचे घाबरले होते. नेमके त्याचवेळी पर्यटकांचे एक वाहन तिथे आल्याने या दोन्ही कर्मचाऱ्यांचा जीव वाचला. वाघ या कर्मचाऱ्यांवर हल्ला करणारच होता. त्याचवेळी पर्यटकांनी आपली कार त्यांच्या मधोमध नेली. त्यामुळे वाघ जंगलात पळून गेला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tadoba tiger in front of bike video tiger news tadoba rgc 76 ssb