नागपूर : देशातील मध्यवर्ती ठिकाण, भोसलेकालीन शहर, मध्य भारताचे मेडिकल हब, शैक्षणिक हब, देशाची टायगर कॅपिटल आणि आता राज्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू असलेल्या नागपुरात देशातील नामांकित टाटा उद्योग समुहाचे व ज्याचा उल्लेख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘देशाचा अभिमान’ असा केला ते ताज  हॉटेल नागपूरमध्ये सुरू होणार आहे. तशी घोषणा इंडियन हॉटेल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुनीत वाटवाल यांनी मुंबईत केली. त्यामुळे नागपुरात आता आणखी एक पंचतारांकित हॉटेल्सची भर पडणार आहे.

नागपूरमध्ये अनेक मोठे उद्योग येऊ घातले आहे. राष्ट्रीय स्तरांवरील शैक्षणिक संस्था, केंद्राचे अनेक राष्ट्रीय पातळीवरील कार्यालये, वैद्यकीय संस्था नागपुरात असल्याने वर्षभर येथे राष्ट्रीय आंतराष्ट्रीय परिषदा, चर्चासत्रे होतात, केंद्र व राज्य शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकाही नागपूरात नियमित होत असतात.  दर आठवड्याच्या शेवटी मुख्यमंत्र्यांचा दौरा नागपूरमध्ये असतो. त्यानिमित्ताने अनेक कार्यक्रम येथे आयोजित केले जातात. या कार्यक्रमाच्या निमित्ताने, बैठकांसाठी वरिष्ठ अधिकारी, देशविदेशातील प्रतिनिधी नागपूरमध्ये येत असतात. देशाचे टायगर कॅपिटल नागपूर असल्याने देशविदेशातील पर्यटकांची संख्या नागपूरमध्ये वाढली आहे. या पार्श्वभूमीवर नागपुरात पंचतारांकित हॉटेल्सची संख्या कमी आहे. त्यात वाढ व्हावी  अशी मागणी अनेक वर्षापासून आहे. त्यादृष्टीने प्रयत्नही सुरू आहेत. जगप्रसिद्ध ताज हॉटेल नागपुरातही असावे,अशी इच्छा अनेकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यापूर्वी व्यक्त केली होती. त्याला आता मूर्त रुप आले आहे. मुंबईत सोमवारी झालेल्या कार्यक्रमात  याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली.

ताज समुहाच्या वांद्र येथील नवीन ताज बॅंड्स स्टॅन्ड या भव्य हॉटेलचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी मुंबईत पार पडले. त्यावेळी बोलताना फडणवीस यांनी ‘आम्ही ताजला नागपुरात मिस करतो, तुम्ही नागपुरात येणार अशी घोषणा याच कार्यक्रमात करा” अशी विनंती केली. त्यावर इंडियन हॉटेल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अधिकारी चटवाल यांनी नागपूरमध्ये ताज हॉटेल उभारले जाणार अशी घोषणा केली. याबाबत सामंजस्य करारही झाल्याचे त्यांनी स्पष्ट केली.  नागपूरच्यादृष्टीने ही मोठी घोषणा मानली जाते.

मुंबई ही भारताची ‘कन्व्हेन्शन कॅपिटल म्हणून नागपुरात उदयास येत आहे. यामुळे मुंबईतील व्यावसायिक संधीत वाढ होईल. मुंबईच्या सौंदर्यात भर घालणारे  पर्यटन घालणारे व पर्यटन व व्यावसायिक दृष्टीकोणातून महत्वाचे ठरणारे हे हॉटेल भविष्यात मुंबईची एक नवी ओळख निर्माण करेल असा विश्वास फडणवीस यांनी या कार्यक्रमात व्यक्त केला.

नागपूरला फायदा काय ?

नागपूर -मुंबई समृद्धी महामार्गामुळे मुंबई-नागपूर प्रवासाचे अंतर फक्त सात तासावर आले आहे. त्यामुळे  मुंबईहून नागपूर  आणि परिसरात पर्यटनासाठी येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विशेषत: विदेशातून व्याघ्रदर्शनासाठी विदर्भात येणाऱ्या पर्यटनाची संख्या दिवसेदिवस वाढतच चालली आहे. त्यांच्यासाठी पंचताराकिंत हॉटेल्सची गरज नागपुरात आहे. सध्या पाच ते सहा पंचतारांकित हॉटेल्स नागपुरात आहेत. पण ताज सारखे हॉटेल्सची कमतरता नागपुरात होती. ताज समुहाचे हॉटेल्स नागपुरात आल्यास उद्योग आणि पर्यटन व्यवसायावाढीसाठीही त्याचा फायदा होईल, असे मानले जात आहे.

Story img Loader