एक चूक जीवघेणी ठरू शकते; मागील वर्षी  दोघांचा मृत्यू

नागपूर : उन्हाळ्यात घरोघरी कुलर लावणे सुरू झाले आहे. कुलरचे अर्थिग बरोबर नसल्याने विजेचा धक्का बसून जीवितहानी होण्याचा धोका असतो. मागील वर्षी  हुडकेश्वर पोलीस ठाण्याअंतर्गत अतुल निगोट आणि बाभुळखेडातील सुनू वाघे यांचा कुलरमध्ये पाणी टाकताना मृत्यू झाला होता. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

उन्हाळ्यात प्रत्येक घरी कुलर लावला जातो. कुलरजवळ खेळताना विजेचा धक्का बसल्याने, तर कधी पंप सुरू करतेवेळी विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाल्याच्या घटना सातत्याने घडतात. हा प्रकार टाळण्यासाठी ग्राहकांनी कुलरचा वापर सदैव थ्री पीन प्लगवरच करावा. घरात अर्थ लीकेज सर्किट ब्रेकर्स बसवून घ्यावे. बाजारात हे उपकरण उपलब्ध असून विजेचा धक्का बसताच या उपकरणामुळे वीज प्रवाह खंडित होऊन अनर्थ टाळता येतो. घरातील अर्थिग योग्य असल्याची तपासणी करून घ्यावी. कुलरच्या लोखंडी भागात वीजपुरवठा येऊ  नये, याकरिता त्याचा थेट जमिनीशी संपर्क येईल अशी व्यवस्था करावी. कुलरमध्ये पाणी भरतेवेळी आधी वीज प्रवाह बंद करावा. कुलरच्या आतील वीज तार पाण्यात बुडली नसल्याची खात्री करावी. कुलरचे पाणी खाली जमिनीवर सांडणार नाही याची काळजी घ्यावी, ओल्या हाताने कुलरला स्पर्श करू नये, वायर तपासूण घ्यावी.  लहान मुलांना  कुलरपासून दूर ठेवावे, अशा सूचना  महावितरणने केल्या आहेत.

महत्त्वाचे

* ओल्या हाताने पंप सुरू करू नये

*   पंपातून पाणी येत नसेल तर वीज प्रवाह बंद करावा

*   पंप आणि वायर पाण्यात बुडली नसल्याची खात्री करावी

*   पंपाचे अर्थिग योग्य असल्याचे तपासून घ्यावे