पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे बुलढाणा जिल्हा संपर्क प्रमुख पदावरून खा. प्रतापराव जाधव यांची उद्धव ठाकरे यांनी हकालपट्टी केली. त्यानंतर सोमवारी लगेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खा. जाधव यांची शिवसेनेच्या बुलढाणा संपर्क प्रमुखपदी पुनर्नियुक्ती केली आहे. जिल्ह्यातील सर्व नियुक्तीचे अधिकारदेखील एकनाथ शिंदे यांनी खा. जाधव यांना दिले आहेत.
बुलढाण्याचे खासदार व शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रतापराव जाधव शिंदे गटात दाखल झाले आहेत. त्यामुळे पक्षविरोधी कारवायाचा ठपका ठेवत त्यांच्यावर संपर्क प्रमुखपदावरून हकालपट्टीची कारवाई रविवारी करण्यात आली. याशिवाय त्यांच्यासोबत शिंदे गटात गेलेले जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी जिल्हाप्रमुख शांताराम दाणे पाटील (विधानसभा मलकापूर, जळगाव जामोद), उपजिल्हाप्रमुख राजू मिरगे, संजय अवताडे, नांदुरा तालुका प्रमुख संतोष डिवरे, मलकापूर तालुका प्रमुख विजय साठे, शेगाव तालुका प्रमुख रामा थारकार यांना पक्षातून काढले होते. शिवसेनेच्या विधानसभा मलकापूर, जळगाव जामोद जिल्हाप्रमुखपदी वसंतराव भोजने यांची नियुक्ती केली.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या कारवाईनंतर तत्काळ मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्ली येथून खा. प्रतापराव जाधव यांची पुनर्नियुक्ती केली आहे. त्यांना बुलढाणा जिल्ह्याच्या संपर्क प्रमुखपदी नियुक्त करण्यात आले असून जिल्ह्यातील सर्व नियुक्त्यांचे अधिकार त्यांना बहाल करण्यात आले आहे. या नियुक्तीबद्दल मुख्यमंत्र्यांनी खा. जाधव यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. या कारवाई व पुनर्नियुक्तीच्या खेळामुळे शिवसैनिक संभ्रमात पडले आहेत.