लोकसत्ता टीम
चंद्रपूर : सध्या सोशल मीडिया आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनला आहे. याचे अनेक उपयोग आहेत. पण सोशल मीडियाचा योग्य पद्धतीने वापर केला नाही तर फार मोठी डोकेदुखीही ठरू शकते. अशीच घटना चंद्रपूर तालुक्यातील तरुणीसोबत घडली. या तरुणीला उत्तर प्रदेशातील तरुणाशी मैत्री करणं चांगलंच महागात पडले आहे. त्याने तिला ब्लॅकमेल करत व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्रामवर तिचे अश्लील व्हिडीओ व्हायरल करीत बदनामी केली. या प्रकारानंतर तरुणीने शनिवारी बल्लारपूर पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी उत्तर प्रदेशातील सूरजकुमार विजय शंकर याच्यावर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.
चंद्रपूर तालुक्यातील व बल्लारपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील कल्पना (२२) (काल्पनिक नाव) ही तरुणी चंद्रपूर येथील एका महाविद्यालयामध्ये बी.ए. प्रथम वर्गात शिक्षण घेत आहे. तिचे व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम व फेसबुक अकाउंट आहे. या सोशल मीडिया चॅटिंगच्या माध्यमातून तिची ओळख उत्तर प्रदेश येथील एका व्यक्तीसोबत झाली. आरोपी सूरजकुमार विजय शंकर याने १ ते १३ ऑगस्ट दरम्यान सोशल चॅटिंगच्या माध्यमातून विश्वास संपादन केला. अशात त्या दोघांनी व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून संपर्क सुरू केला. व्हिडीओ कॉल करताना अश्लील संभाषण, चित्र व अन्य बाबीचे दर्शन घडले. याची थोडीही कल्पना त्या तरुणीला न देता, आरोपीने सर्व प्रकारचे व्हिडीओ अपलोड केले. एवढेच नव्हे तर ते इतर समाज माध्यमातील मित्रांत व्हायरल करण्याची तिला धमकी दिली.
आणखी वाचा-गडचिरोली : मोबाईल चार्जरसाठी युवतीला बेदम मारहाण; संतापाची लाट…
बनावट फेसबुक खाते उघडून अश्लील व्हिडीओ व्हायरल केले. अश्लील चॅटिंग व व्हिडीओ कॉल रेकॉर्डचे समाज माध्यमातील व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला वितरण करून चरित्र हनन केले. हा घृणास्पद प्रकार पाहून तिचे अवसान गळाले. या प्रकाराला कंटाळून तिने पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. तरुणीची बदनामी समाज माध्यमातून केल्याने बल्लारपूर पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००चे कलम ६६(ई) व ७७ – ए आणि भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३५१(२), ३५१(३), ३५६, ७७ अन्वये उत्तर प्रदेश येथील सूरजकुमार विजय शंकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास बल्लारपूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक गाडे करीत आहेत.
आणखी वाचा-रक्षाबंधनाला सोने घ्यायचा विचार करताय? पण, दरात मात्र…
आपलीही होऊ शकते फसवणूक
अनोळखी व्यक्तीसोबत सोशय मीडियावर ओळख करताना, चॅटिंग करताना काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा आपलीही फसवणूक होऊ शकते. फसवणूक होण्यापूर्वी समोरील व्यक्ती कोण, कसा आहे, कुठचा आहे, त्याचा काय उद्देश आहे या सर्व बाबी तपासणेही महत्त्वाचे आहे. त्यामुळे समाजमाध्यमावर ओळखी करतांना जपून राहावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे.