नागपूर : इंटर मॉडेल स्थानकामुळे आधीच वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या अजनी रेल्वे वसाहतीत आता स्थानक विस्तारीकरणासाठी शेकडो झाडे विनापरवाना तोडल्याची घटना समोर आली आहे. महापालिकेने केवळ नोटीस देऊन हात आखडता घेतल्याने वृक्षप्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे.
अजनी रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी आणि वाहनतळासाठी, रेल्वे भूविकास प्राधिकरणाने अजनी रेल्वे वसाहतीतील शेकडो झाडे नागपूर महापालिकेच्या उद्यान विभागाची परवानगी न घेता तोडल्याचा आरोप आहे. इंटर मॉडेल स्थानकामुळे आधीच ही वसाहत चर्चेत आली आहे. या प्रकल्पासाठी हजारो झाडे तोडली जाणार असल्याने वृक्षप्रेमींनी याविरोधात आंदोलन केले. आता स्थानक विस्तारीकरण प्रकल्पामुळे अजनी वसाहत चर्चेत आली आहे.
रेल्वे रुळाजवळील वसाहतीत मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्याची माहिती मिळताच महापालिकेचे उद्यान अधीक्षक अमोल चोरपगार यांनी घटनास्थळी धाव घेतली. उद्यान विभागाची परवानगी न घेता शेकडो झाडे तोडल्याचे त्यांना आढळले. गुरुवारी शहरात मोठ्या प्रमाणात वादळीवाऱ्यासह पावसाने थैमान घातले. त्यामुळे मोठमोडी शेकडो झाडे उन्मळून पडली. तर काही झाडांच्या फांद्या तुटून पडल्या. त्याचवेळी दुसऱ्या दिवशी अजनी वसाहतीतील या वृक्षतोडीचे प्रकरणदेखील समोर आले. त्यामुळे या घटनेचा फायदा घेऊनच तर ही वृक्षतोड करण्यात आली नसावी ना, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात विनापरवानगी वृक्षतोड होणे ही बाब धक्कादायक आहे. त्यासाठी केवळ संबंधित यंत्रणेला नोटीस बजावून होणार नाही तर अवैध वृक्षतोड अधिनियमानुसार कठोर कारवाई व्हायला हवी, असे वृक्षप्रेमी कुणाल मौर्या म्हणाले. यावेळी त्यांनी अजनी वसाहतीतील आधीचे आणि नंतरचे छायाचित्र ‘लोकसत्ता’सोबत सामायिक केले.