वर्धा : तलाठी संख्या कमी व कामे भरपूर. नवी भरती व्हायची आहे. म्हणून आहे त्यांनी मुख्यालयी थांबा, असा आदेश शासनाने काढला आहे. विविध प्रकारच्या दाखल्यांसाठी गावकऱ्यांनी तलाठी कार्यालयात चकरा माराव्या लागतात. पीकपाणी, नुकसान पंचनामे, दुष्काळ,अतिवृष्टी आदी प्रसंगी नोंदणी व पुनर्वसनाच्या कामात तलाठी महत्त्वपूर्ण ठरतात. परंतु ते त्यांच्या गाव मुख्यालयाच्या ठिकाणी थांबत नसल्याच्या तक्रारी वाढत आहे.
सद्यस्थितीत राज्यात क वर्गीय तलाठ्यांची १५ हजार ७४४ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ५०३८ इतकी पदे रिक्त आहेत. नव्याने ४ हजार ६४४ पदे भरण्याची जाहिरात दिली आहे. असे नमूद करीत महसूल विभागाने एका तलाठ्याकडे एकापेक्षा अधिक गावांचा कारभार असल्याचे स्पष्ट केले. म्हणून नवीन भरती होईपर्यंत कार्यभार असलेल्या ठिकाणी उपस्थित राहण्याची सूचना करण्यात आली आहे. तलाठ्यांनी त्यांचा नियोजित दौरा, बैठक याबाबत त्यांच्या उपस्थितीचे वेळापत्रक ग्रामपंचायत कार्यालय परिसरात लावण्याचे निर्देश आहेत.
हेही वाचा – राज्यात दिवसाला ४२ नागरिकांचा रस्ते अपघातात मृत्यू
हेही वाचा – Talathi Bharti: पेपरफुटीविरोधात विद्यार्थी संतप्त!
त्यांचा मोबाईल क्रमांक दर्शनी भागात लावावा. तशी सूचना मंडळ अधिकारी व नायब तहसीलदार यांना देण्याचे सांगण्यात आले आहे. जनतेची गैरसोय होणार नाही, अशी काळजी घ्यावी म्हणून सूचित करण्यात आले आहे.