नागपूर : तलाठी भरतीच्या पहिल्याच दिवशी पेपर फुटला. नाशिक येथून पकडण्यात आलेल्या आरोपीच्या भ्रमणध्वनीमध्ये प्रश्नपत्रिकेतील चित्रण केलेल्या प्रश्नांसह सीम कार्ड, वॉकी टॉकी आढळून आली. या प्रकारामुळे विद्यार्थी संतप्त झाले असून त्यांनी परीक्षा स्थगित करण्याच्या मागणीसह राज्यभर आंदोलनाचा इशारा दिला आहे. प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनीही नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या राज्यातील लाखो तरुणांच्या भवितव्याशी राज्य सरकार खेळ खेळत असून फुटीमागे असणाऱ्यांना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी केली आहे.
शासनाचा निष्काळजीपणाच कारणीभूत – रोहित पवार
नोकरीच्या अपेक्षेने सामान्य कुटुंबातील मुले-मुली मोठय़ा कष्टाने अभ्यास करतात, परंतु शासनाच्या निष्काळजीपणामुळे पेपरफुटीसारखे प्रकार घडतात. वन विभागाच्या परीक्षांचे पेपर फुटल्यावर मी अधिवेशनात आवाज उठवला असता गृहमंत्र्यांनी पेपर फुटल्याचा बातम्या खोटय़ा असल्याचे सांगत राज्याची दिशाभूल केली होती. त्यामुळे आतातरी शासनाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे.