नागपूर : राज्यात ४६४४ तलाठी पदाच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. ही पदभरती ऑनलाइन परीक्षेच्या माध्यमातून होणार असून कुठल्याही शाखेतील पदवीधराला यासाठी २६ जून ते १७ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे.
राज्यातील लाखो उमेदवार तलाठी पदाच्या भरतीची अनेक दिवसांपासून वाट पाहत होते. ३६ जिल्ह्यांसाठी ही जाहिरात असून उमेदवारांना कुठल्याही जिल्ह्यासाठी अर्ज करता येणार आहे. सध्या परीक्षेची तारीख ठरली नाही. संकेतस्थळावर ती प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दोनशे गुणांची परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून ती वस्तुनिष्ठ पद्धतीने घेण्यात येणार आहे. एकूण गुणांच्या ४५ टक्के गुण घेणे आवश्यक राहणार आहे. अर्जदारांना ९०० रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात आले आहे.