लोकसत्ता टीम
नागपूर : भूमी अभिलेख विभागाकडून राज्यभरात १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर २०२३ या कालावधीत घेण्यात आलेल्या तलाठी भरती परीक्षेची उत्तरतालिका जाहीर करण्यात आली आहे. २८ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत उत्तरपत्रिका पाहता येणार आहे. उत्तरपत्रिका पाहण्यासाठी संबंधित उमेदवादारांच्या ऑनलाइन लॉगइनमध्ये सोय करण्यात आली आहे. उमेदवारांना काही हरकत असल्यास ती परीक्षा घेतलेल्या टीसीएस कंपनीकडे नोंदविताही येणार आहे.
आणखी वाचा-चंद्रपूर जिल्ह्यात सुगंधी तंबाखू तस्करी जोरात
भूमी अभिलेख विभागाकडून तलाठी भरती परीक्षेनंतरची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार आता परीक्षा दिलेल्या उमेदवारांना उत्तरतालिका पाहण्यासाठी https://mahabhumi.gov.in/mahabhumilink ही लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. उत्तरतालिका पाहिल्यानंतर उमेदवारांना काही शंका, आक्षेप, हरकत असल्यास त्या नोंदवता येणार आहे. एका हरकतीला १०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. आक्षेप योग्य असल्यास ही रक्कम संबंधित उमेदवाराला परत केली जाणार आहे. मात्र, आक्षेप अयोग्य असल्यास १०० रुपये शुल्क परत केले जाणार नाही. तसेच उमेदवारांकडून नोंदविण्यात आलेले आक्षेप टीसीएस कंपनीच्या समितीकडे जातील. या समितीकडून प्राप्त आक्षेपांचे निरसन केले जाणार आहे. ही प्रक्रिया झाल्यानंतर निकाल संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाईल. संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणारा निकाल अंतिम राहणार असून, त्याबाबत कोणतेही आपेक्ष, हरकती स्वीकारल्या जाणार नाहीत.