वर्धा: राज्य परीक्षा समन्वयक कार्यालयाकडून आलेल्या अर्जाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. महसूल विभागाकडून तलाठी पदाच्या ४ हजार ६४४ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. या जागांसाठी राज्यातून १० लाख ४१ हजार इच्छुकांनी अर्ज सादर करीत विक्रमच केला आहे.
सर्वाधिक १ लाख १४ हजार अर्ज एकट्या पुणे जिल्ह्यातून आले आहे. तलाठी परीक्षा तीन टप्प्यातून होत आहे. प्रथम १७ ते २२ ऑगस्ट, द्वितीय २६ ऑगस्ट ते १ सप्टेंबर तर तृतीय ४ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर असे तीन टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यातील प्रवेशपत्र जारी करण्यात आले आहे. पेपरफुटीच्या घटना उजेडात आलेल्या नागपूर, जळगाव, औरंगाबाद, नाशिक, धुळे अश्या काही जिल्ह्यातून अर्ज करणाऱ्या उमेदवारांची संख्या लक्षणीय असल्याचे तथ्य पुढे आले आहे.