अमरावती : राज्य सरकारने मध्यप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू केली. योजनेसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १५ जुलैपर्यंतच असल्याने, महिलांनी पहिल्या दिवसापासूनच गर्दी केली आहे, पण या योजनेच्या नावाखाली अर्जदारांची लूट सुरू असल्याच्या घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील वरूड येथे एक तलाठी अर्जदार महिलांकडून पैसे घेत असल्याची चित्रफित समाज माध्यमावर प्रसारीत झाली आहे. याप्रकरणी तलाठ्याला निलंबित करण्यात आले आहे. तुळशीराम कंठाळे असे निलंबित करण्यात आलेल्या लाचखोर तलाठ्याचे नाव आहे. जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी मंगळवारी यासंदर्भात माहिती दिली.
हेही वाचा >>> अमरावती : देवेंद्र फडणवीस यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर छायाचित्रकार नाराज, माफीची मागणी
महाराष्ट्र शासनाने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना १ जुलैपासून सुरू केली. या योजनेसाठी २१ ते ६० वर्षे वयोगटातील महिला पात्र असून यासाठी १ जुलैपासून तलाठी कार्यालय तसेच शहरी भागात तहसील कार्यालयात आणि कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. अमरावती शहरासह जिल्ह्यात सर्व ठिकाणी या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी महिलांची झुंबड उडाली आहे. वरुड येथे या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी तुळशीराम कंठाळे हा तलाठी चक्क महिलांकडून पैसे वसूल करत असल्याचे समोर आले. महिलांकडून पैसे उकळतानाची त्याची चित्रफित आणि छायाचित्र प्रसारीत झाल्याने खळबळ उडाली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महत्वकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत महिलांना लाभ मिळावा असा उद्देश असताना महिलांकडूनच या योजनेसाठी लाच स्वीकारणाऱ्या तलाठ्याच्या प्रतापाची दखल स्वतः मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. यामुळच त्या तलाठ्याला तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. त्याच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी सांगितले.
हेही वाचा >>> वर्धा : तळ्यात मळ्यात ! विधानसभेसाठी दोन तगड्या उमेदवारांची राजकीय पक्ष की अपक्ष अशी दुविधा
जिल्हास्तरावर या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली असून जास्तीत जास्त पात्र महिलांनी या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. १५ जुलैपर्यंत अर्ज संकलित करण्यात येणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामपंचायत पातळीपर्यंत अर्जाचा नमुना उपलब्ध करुन दिला जात आहे. ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न २.५०लाख रुपयांपेक्षा अधिक असेल.ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता असेल, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य कायम किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी सेवेत असेल किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत. परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी असेल, लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेव्दारे १५०० रुपया पेक्षा जास्त लाभ घेतला असेल, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार/आमदार असेल, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किवा राज्य सरकारच्या मंडळाचे सदस्य असेल ,ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन असेल, ज्यांच्याकडे चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) असेल त्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.