अकोला महापालिकेच्या मालमत्ता कर वसुलीला वेग येण्यासाठी ३१ मार्चपर्यंत शास्ती माफ करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला. त्यामुळे याअगोदर शास्ती भरलेल्या रक्कमेचा प्रश्न निर्माण झाला होता. शास्ती भरलेल्या मालमत्ताधारकांच्या सुमारे सहा कोटी रुपयांचे समायोजन आगामी वर्षातील करात करण्यात येणार आहे. त्यामुळे हजारो मालमत्ता कर धारकांना दिलासा मिळाला आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात महापालिकेकडून कर वसुलीवर जोर दिला जात आहे.
महापालिकेचा मालमत्ता कर हा उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून मालमत्ता कर वसुलीवर लक्ष केंद्रित केले जाते. मार्च महिन्यात तर कर वसुलीचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी अत्यंत वेगाने मोहीम राबविण्यात येते. मालमत्ता कर न भरणाऱ्यांवर कारवाई करून सील लावण्याची प्रक्रिया देखील करण्यात येते. सील केलेलया मालमत्तांचा लिलाव करण्याचा निर्णय देखील महापालिकेने घेतला. महापालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक कविता द्विवेदी यांनी मालमत्ता कर वसुलीसाठी नियोजन केले. कर वसुली करणाऱ्या नियमित कर वसुली लिपिकासोबतच प्रत्येक झोनमध्ये चार विशेष पथक तयार करण्यात आली आहेत.
हेही वाचा >>> चंद्रपुरात ‘‘हर घर राहुल गांधी”! पडोलीतील प्रत्येक घरावर छायाचित्र; एनएसयूआयचा उपक्रम
थकीत मालमत्ता करावर महापालिकेकडून दरमहा दोन टक्के व्याज आकारले जाते. मूळ करावर व्याजाची रक्कमच मोठी होते. शास्तीसह कर वसुली सुरू करण्यात आली होती. १ एप्रिल २०२२ ते १० मार्च २०२३ पर्यंत हजारो मालमत्ताधारकांनी शास्तीसह कर भरला. या काळात शास्ती स्वरूपात सुमारे सहा कोटी रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले. मालमत्ता कर भरणसाठी प्रोत्साहन करण्यासह व्याजाचा फटका नागरिकांना बसू नये, यासाठी महापालिका प्रशासनाने ११ मार्चपासून अभय योजना सुरु केली. या योजनेअंतर्गत थकीत कराचा भरणा केल्यास व्याजाची आकारणी केली जात नाही. त्यामुळे या अगोदर कर भरलेल्या नागरिकांच्या रक्कमेचे काय? असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावर महापालिकेने निर्णय घेतला असून शास्तीची रक्कम आगामी वर्षातील मालमत्ता करामध्ये समायोजन करण्यात येईल. व्याज भरलेल्या मालमत्ताधारकांची ती रक्कम कमी आगामी वर्षातील करातून कमी होणार आहे. अभय योजनेसाठी आता अखेरचे तीन दिवस राहिले असून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले. महापालिकेला चालु आर्थिक वर्षात १२२ कोटी २५ लाख थकीत तर ७९ कोटी ५९ लाख चालू आर्थिक वर्षातील असा २०१ कोटी ८४ लाख रुपयाचा कर वसुलीचे लक्ष्य होते. थकीत करापैकी ३४ कोटी ६४ लाख रुपये तर चालू आर्थिक वर्षातील ३४ कोटी ६४ असा एकुण ६९ कोटी २८ लाख रुपयाचा कर वसूल झाला.
शास्ती भरलेल्या करधारकांना प्रशासनाकडून दिलास देण्यात येणार असून त्यांनी भरलेल्या व्याजाच्या रक्कम आगामी मालमत्ता करामध्ये समायोजित करण्यात येईल. अभय योजनेचे शेवटचे चार दिवस राहिले असून त्याचा करधारकांनी लाभ घ्यावा. – विजय पारतवार, कर अधीक्षक, महापालिका, अकोला.