नागपूर : ३९ कोटींच्या बेकायदेशीर व्यवहारांच्या माध्यमातून खोट्या देयकाच्या आधारे शासनाचा ६.९८ कोटी रुपयांचा कर बुडवणाऱ्या नागपूरच्या विजय लक्ष्मणराव पेशने या व्यापाऱ्यास महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने अटक केली. मेसर्स सटवाई इंडस्ट्रीज व मेसर्स बिर्ला बॅटरीज या दोन प्रतिष्ठानांच्या तपासणी दरम्यान बोगस पुरवठादार व्यापाऱ्यांचे जाळे उघडकीस आले. त्यांची चौकशी केली असता अशा प्रकारे ३९ बोगस प्रतिष्ठानांच्या माध्यमातून खोट्या देयकांच्या आधारे शासनाचा ६.९८ कोटी रुपयांचा कर बुडवण्यात आल्याचे स्पष्ट झाले.
यासंदर्भात मेसर्स सटवाई इंडस्ट्रीजचे मालक विजय पेशने यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकाऱ्यांनी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ही कारवाई नागपूर क्षेत्राचे अप्पर राज्यकर आयुक्त अनंता राख, राज्यकर सहआयुक्त, संजय कंधारे, राज्यकर उपायुक्त, ( अन्वेषण ) विलास भा . पाडवी यांच्या नेतृत्वाखाली सहायक राज्य कर आयुक्त दीपक शिरगुरवार यांनी सहायक राज्यकर आयुक्त सचिन धोडरे व संतोष हेमने व अन्वेषण शाखेतील राज्यकर निरीक्षकांच्या व कर सहाय्यकांच्या मदतीने केली. अशाप्रकारच्या धडक मोहिमेअंतर्गत महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाने या आर्थिक वर्षात करचुकवेगिरी करणाऱ्या ४४ व्यक्तींना अटक केली.