सुमित पाकलवार
वडिलांच्या व्यवसायात हातभार लावण्याच्या उद्देशाने वयाच्या २४ व्या वर्षी ‘टॅक्सी’चे ‘स्टिअरिंग’ हातात घेत पुरुषांची मक्तेदारी असेलल्या क्षेत्रात पाऊल टाकले आणि आता उच्च शिक्षणासाठी इंग्लंडच्या प्रसिद्ध ‘लीड्स’ विद्यापीठात प्रवेश मिळविला. गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम अशा रेंगुंठा येथील किरण कुरमावार या तरुणीने सर्वांसमोर आदर्श ठेवला आहे.
हेही वाचा >>>“…तर ५० वर्षांनंतर अयोध्येतील राम मंदिराला धोका”, प्रविण तोगडीयांचं मोठं विधान, म्हणाले, “मोदी-शाहांनी…”
गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या सिरोंचा तालुक्यातील रेगुंठा या दुर्गम गावात राहणाऱ्या किरणला आधीपासूनच उच्च शिक्षण घेण्याची जिद्द होती. हीच जिद्द उराशी बाळगून किरणने हैद्राबाद येथील उस्मानिया विद्यापीठात प्रवेश मिळविला. तेथे अर्थशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. पण घरची परिस्थिती बेताची असल्याने २०१८ ला घरी परतून तिने वडिलांच्या व्यवसायात हातभार लावण्याचे ठरविले. परंतु त्या भागात मुलीने प्रवासी वाहन चालविणे सोपे नव्हते. घनदाट जंगल, डोंगराळ भाग असूनही न डगमगता किरणने तीन वर्षे टॅक्सी चालविली. सुरवातीला किरणच्या टॅक्सीतून प्रवास करायला लोक घाबरायचे, पण काही काळाने त्यांची भीती दूर झाली. एक तरुण मुलगी टॅक्सी चालवताना बघून अनेकांना आश्चर्य वाटायचे. पण किरणच्या मनात कधीच तिने निवडलेल्या क्षेत्राबद्दल साशंकता नव्हती. मात्र, मनात असलेली उच्च शिक्षणाची जिद्द तिला स्वस्त बसू देत नव्हती. मग तिने परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी काय करावे लागेल हे शोधणे सुरू केले.
हेही वाचा >>>“काही लोक नोंदणी करूनही…”; अमोल मिटकरींचा नाव न घेता रणजीत पाटलांना टोला!
दरम्यान, बीड येथे एकलव्यच्या कार्यशाळेत तिची भेट राजू केंद्रे आणि विशाल ठाकरे यांच्याशी झाली. त्यांनी तिला प्रवेश प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन केले. या जोरावर किरणने विदेशातील काही विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी प्रयत्न चालू केले. २०२२ सप्टेंबरमध्ये काही विद्यापीठाच्या प्रवेशपूर्व परीक्षा दिल्या. यात तिला यश मिळाले. जगात ८६ वे मानांकन असलेल्या इंग्लंडमधील ‘लीड्स’ विद्यापीठात एमएससी ‘मार्केटिंग मॅनेजमेंट’च्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळाला. गडचिरोली जिल्ह्यातील रेगुंठा सारख्या दुर्गम भागातून येऊन सुध्दा जिद्द आणि संघर्षाच्या बळावर मिळविलेल्या यशाबद्दल किरणचे सर्वत्र कौतुक होत आहे. परंतु हा संघर्ष इथेल संपलेला नाही. प्रवेश तर मिळाला पण विद्यापीठाचे २७ लाख इतके शुल्क कुठून भरावे हा नवा प्रश्न किरणपुढे उभा ठाकला आहे. त्यासाठी शासन किंवा एखाद्या संस्थेकडून शिष्यवृत्ती मिळेल काय, याचा शोध सुरू आहे. वेळप्रसंगी घर गहाण देखील ठेवायची किरणच्या पालकांची तयारी आहे.
उच्च शिक्षण घेण्याचा जिद्दिमुळेच मला आज विदेशात शिक्षणाची संधी उपलब्ध झाली आहे. परंतु शिक्षण शुल्क भरणे आमच्यापुढे आव्हान आहे. त्यासाठी आम्ही घर देखील गहाण ठेवण्याची तयारी दर्शविली परंतु बँकांनी नकार दिला. आता शासनाकडून शिष्यवृत्ती मिळेल ही अपेक्षा आहे.- किरण कुरमावार ,रेगुंठा.