अमरावती : नांदगावपेठ येथे टॅक्सी चालकाचा गळा कापून त्याची हत्या करणाऱ्या मुख्य आरोपीला अटक करण्यात गुन्हे शाखेला ८० दिवसांनंतर यश आले. त्याला पुण्यातून अटक करण्यात आली. नितीन दादासो काळेल (२३, रा. वळई, ता. मान, जि. सातारा) असे आरोपीचे नाव आहे.
आरोपी नितीनला त्याच्या प्रेयसीला पळवून न्यायचे होते. त्यासाठी कुस्तीच्या आखाड्यात ओळख झालेल्या सिद्धेश्वरची त्याने मदत घेतली. देशी कट्टा आणण्यासाठी त्यांनी बिहारचे दरभंगा गाठले. तेथून परतताना राजनांदगाव, जबलपूर येथे टॅक्सी पळविण्याचा प्रयत्न त्यांनी केला. पण तो यशस्वी होऊ शकला नाही. अखेर नागपूर येथून टॅक्सीचालक अजीम खानला घेऊन नांदगावात पोहोचले. तेथे त्याची टॅक्सी पळवून नेण्याचा प्रयत्न झाला. मात्र, अजीम खानने प्रतिकार केला. त्यामुळे नितीनने त्याची हत्या केली. त्याने अजीम खान याच्यावर कुकरीने हल्ला चढविल्याचे निष्पन्न झाले आहे.
हेही वाचा – सिंधूताईंच्या माहेरच्या वारकऱ्यांना कर्मभूमी पुण्यात पुरणपोळीचा पाहुणचार
याप्रकरणी आधी अटक केलेला सिद्धेश्वर चव्हाण (२६, रा. खलवे, जि. सोलापूर) हा जिल्हा कारागृहात बंद आहे. २६ मार्च रोजी पहाटे ३:४५ वाजेच्या सुमारास हत्येची घटना घडली होती. मृताची ओळख अजीम खान खालिद खान (२७, रा. नागपूर) अशी पटली. त्याचे चारचाकी वाहन रहाटगावनजीक अपघातग्रस्त स्थितीत आढळले. त्यामुळे अजीम खानची हत्या करून आरोपी मृताची कार घेऊन पळाल्याचे व तिला पुढे अपघात झाल्याचे स्पष्ट झाले होते. आरोपी हे बडनेराहून वाहनाने बुलढाणा, चिखली, अहमदनगरमार्गे शिर्डीला पोहोचल्याची माहिती मिळताच आरोपींपैकी सिद्धेश्वर चव्हाण याला १ एप्रिल रोजी शिर्डीहून ताब्यात घेण्यात आले होते.
हेही वाचा – वर्धा : ‘पुष्पा’ आणि ‘छाया’ची अतूट मैत्री, करुणाश्रमात धूम
आरोपी नितीन काळेल हा हरियाणातून १५ जूनला पुण्याला मित्राकडे येत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. पोलीस पथकाने पुणे गाठत त्याला आल्याबरोबर ताब्यात घेतले. तपासादरम्यान आरोपींनी दरभंगाहून कट्टा आणला की कसे, याची चौकशी केली जाईल. त्याला १९ जूनपर्यंत पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली.