नागपूर : विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवणाऱ्या महायुती सरकारमधील नेत्यांनी विरोधी पक्ष संख्येने कमी असले तरी त्यांचा सन्मान राखला जाईल, अशी भूमिका निकालाच्या पहिल्या दिवसापासून घेतली खरी, पण विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या संख्याबळाचा वारंवार उल्लेख करून व नंतर त्यांचा सन्मान राखला जाईल, असे सांगत एकप्रकारे त्यांना हिणवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोमवारपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला. बीडमधील सरपंचाची हत्या, परभणीतील हिंसाचार आणि सोयाबीन, कापूस उत्पादकांची दैना ही कारणे त्यांनी बहिष्कारासाठी दिली. हा मुद्दा घेऊन संध्याकाळी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान रामगिरीवर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लक्ष्य केले. पत्रकार परिषदेची सुरुवात करतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चहापानाची बहिष्काराची परंपरा चालू ठेवावी का असा प्रश्न केला. विरोधकांच्या संख्येचा उल्लेख करीत त्यांची संख्या कमी असली तरी आम्ही त्यांच्या प्रश्नाला सभागृहात उत्तरे देऊ, कामकाज रेटून नेणार नाही, असे सांगितले.

हेही वाचा – मंत्रिमंडळाचा अखेर शपथविधी; ४३ पैकी एक मंत्रीपद अद्याप रिक्त

दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही विरोधकांच्या संख्याबळाचा आवर्जून उल्लेख केला. ते म्हणाले, लोकांनी विरोधकांना नाकारले व आम्हाला स्वीकारले हे सत्य आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी आवश्यक संख्याबळही त्यांना मिळवता आले नाही, हे सांगायलाही ते विसरले नाहीत. जनतेनेच त्यांच्यावर बहिष्कार घातला. त्यामुळे त्यांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार घातला, अशी टीका शिंदे यांनी केली आणि संख्येने कमी असले तरी आम्ही त्यांना कमी लेखणार नाही, अशा शब्दात विरोधकांना चुचकारण्याचाही प्रयत्न केला. फडणवीस यांनीही विरोधी पक्षाचा आवाज दाबणार नाही, पण त्यांनी चर्चेत सहभागी व्हावे, असे आवाहन केले.

हेही वाचा – जेव्हा मंत्री माहिती कार्यालयच्या गाडीत बसून मंत्रिमंडळ बैठकीत जातात

विरोधी पक्षनेतेपदाच्या नियुक्तीबाबत फडणवीस यांना विचारणा केली असता त्यांनी हा निर्णय सरकार घेत नाही तर विधानसभेचे अध्यक्ष घेतात. ते जे निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, असे फडणवीस म्हणाले. एकूणच मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेचा सूरच विरोधी पक्षाला त्यांच्या संख्याबळावरून हिणवण्याचा होता. मात्र, ते करण्यापूर्वी त्यांचा सन्मान राखला जाईल हे पालूपद सत्ताधारी पक्षाचे नेते जोडत होते हे येथे उल्लेखनीय.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tea party ramgiri nagpur devendra fadnavis ajit pawar eknath shinde mahavikas aghadi boycott mahavikas aghadi mla number cwb 76 ssb