नागपुरातील गुंडगिरी – भाग २
चांगली संगत आणि संस्कारामुळे एक चहा विकणारा देशाचा प्रंतप्रधान बनले, तर नागपुरातील दुसरा चहा विक्रेता संगतीनेच बिघडला आणि राजकीय पुढाऱ्यांच्या आशीर्वादाने ‘डॉन’ बनला.
नागपूरच्या गुन्हे जगतात मनोज महाजन, भवानी सोनी, भरत मोहाडीकर, संजय निखारे, निखिल उमरेडकर, सचिन भोयर, प्रशांत चलपे, गौरव चकोले, राजू चिऱ्या ऊर्फ इखार, आनंद महाराज आदींची नावे सांगता येतील. त्यांच्यातील एक असलेल्या कुख्यात संतोष आंबेकरच्या नावाला ‘डॉन’चे वलय प्राप्त झाले. संतोष आंबेकर हा ‘डॉन’ होण्यामागची अनेक कारणे आहेत. मध्य नागपूरच्या गुन्हेगारी जगतात मनोज महाजन याचे मोठे नाव होते. पंधरा वर्षांपूर्वी महाविद्यालयीन शिक्षण घेताना मनोजने लाकडी पुलाजवळ एकाचे शिर धडावेगळे करून निर्घृण खून केला होता. यानंतर त्याला कारागृहात जावे लागले. त्यानंतर त्याने खुनाच्या गुन्ह्य़ापासून परावृत्त होऊन क्रिकेटवर सट्टा लावण्याचे काम सुरू केले व नावारूपास आला. आज तो गडगंज संपत्तीचा धनी आहे. भवानी सोनीही गुन्हेगारीतील मोठे नाव होते. परंतु कॉटन मार्केट परिसरात बाल्या गावंडे याने त्याचा गेम केला. मध्य नागपुरात संतोष आंबेकरसमोर भरत मोहाडीकरचे सर्वात मोठे आव्हान होते. भरतने राजकारणातही नशीब आजमावले आणि एकदा नगरसेवक म्हणून निवडूनही आला होता. परिसरात त्याची प्रचंड दहशत होती. रेखा निखारे हत्याकांडात त्याचे नाव समोर आले होते. त्या प्रकरणात त्याला न्यायालयाने शिक्षाही ठोठावली होती. यानंतर भरत मोहाडीकर कारागृहाबाहेर आला असता संजय निखारे याने बहिणीच्या खुनाचा वचपा काढला.
संजय निखारे याच्या माध्यमातून संतोष आंबेकरने भरत मोहाडीकरचा काटा काढल्याचे बोलले जाते. मात्र पोलिसांकडे आंबेकरविरुद्ध एकही पुरावा नाही. निखिल उमरेडकर याचेही गुंड म्हणून नाव घेतले जाते. निखिल हा चांगल्या घरचा मुलगा होता. मात्र वाईट संगतीमुळे तो गुन्हेगारी क्षेत्राकडे वळला. संजय निखारेचा सर्वात विश्वासू अशी त्याची ओळख होती. इतवारीतील प्रसिद्ध गंगाजमुना या वेश्यावस्तीत कुख्यात राजू चिऱ्या ऊर्फ राजू इखारची दहशत होती. वर्चस्वाच्या लढाईत त्याचा वेश्यावस्तीतच खून झाला. सुरुवातीच्या काळात बबलू मोहिते हा आंबेकरचा खास नंबरकारी होता.
कालांतराने त्याने गुन्हे जगताला रामराम करीत कुटुंबात रममान झाला. संतोष आंबेकरचे भाचे शैलेश केदार, सनी वर्मा आणि त्यांचे मित्र त्याच्यासाठी काम करतात.
सोन्याच्या चोरीतून गुंडगिरीला सुरुवात
संतोष आंबेकर हा सराफा बाजारात चहा विकायचा. त्यामुळे त्याला सराफा बाजारात येणाऱ्या तस्करीच्या सोन्याची टीप असायची. काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या युवकांना हाताशी घेऊन तो सोने लुटायचा. यातून त्याची सराफा बाजारात दहशत निर्माण झाली. हळूहळू तो सराफा बाजारातून खंडणी वसूल करू लागला आणि नावारूपास आला. जवळपास पंचवीस वर्षांपूर्वी सराफा ओळीतील बंगाली कारागिराचा खून झाला होता. त्यावेळी त्याच्याजवळचे १० किलो सोने लुटून त्याचा मृतदेह रेल्वे क्रॉसिंगवर फेकण्यात आला होता. अद्याप या खुनातील आरोपी पोलिसांना सापडू शकले नाही. आज त्याचा मुख्य धंदा हा खंडणीचा आहे. आज तो गजगंड संपत्तीचा मालक असून त्याने रियल इस्टेट व्यवसायातही पाय ठेवला आहे.

माजी मंत्री, पोलीस आयुक्तांशी संबंध?
संतोष आंबेकरचे नागपुरातील काँग्रेसचे माजी मंत्री आणि माजी पोलीस आयुक्तांशी जवळचे संबंध असल्याची चर्चा गुन्हे वर्तुळात आहे. त्यांच्या मदतीने आंबेकरने आपले साम्राज्य वाढविले असून त्याच्याविरुद्ध उच्च न्यायालयात एक प्रकरणही दाखल आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या काळात नागपुरातील भाजप नेत्यांशी त्याने जवळीक करण्याचा प्रयत्न केला. परंतु आपण अडचणीत येऊ या भीतीने त्यांनी आंबेकरला दूर केले, अशी माहिती आहे.

Story img Loader