कविता नागापुरे
२२ फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या शिक्षक भरतीसाठी घेतली जाणारी अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी ही शिक्षकांसाठी आहे की बँकेत नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी, असा प्रश्न परीक्षार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे.शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टेट) परीक्षा २२ फेब्रुवारी ते ३ मार्चपर्यंत होत आहे. डिसेंबर २०१७ मध्ये राज्यात पहिल्यांदा अभियोग्यता परीक्षा घेण्यात आली होती. मात्र तत्कालीन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी जाहीर केलेली पदभरती अजून झालेली नाही. अशातच पहिल्या परीक्षेत ज्यांना संधी मिळाली नाही, अशा उमेदवारांना २०२२ च्या अभियोग्यता चाचणीत संधी मिळणार या अपेक्षेने जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी तयारी केली. मात्र प्रत्यक्षात परीक्षार्थ्यांनी पेपर पॅटर्न, अभ्यासक्रम , परीक्षेचा वेळ आणि आयबीपीएस कंपनी अशा अनेक गोष्टींवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
हेही वाचा >>>चंद्रपूर: टॅब वाटप, एकाच वेळी ५०० पेक्षा अधिक विद्यार्थी आल्याने गोंधळ
जिल्ह्यातील भिलेवाडा येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात असलेल्या परीक्षा केंद्रावर हजारो विद्यार्थी ‘टेट’ ची परीक्षा देण्यासाठी आले असता आयबीपीएस आणि शिक्षण विभागाच्या नावाने बोटे मोडताना दिसली. एमआयईटी शहापूर येथील प्राध्यापक वाय. टी. शेंडे यांनी २२ फेब्रुवारी रोजी ‘ टेट ‘ दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, नेहमी बँकेच्या परीक्षा घेणाऱ्या आयबीपीएस कंपनीला परीक्षेची जबाबदारी दिल्यामुळे हा गोंधळ झाला आहे. या परीक्षेत मराठी, हिंदी , इतिहास , भूगोल, सामान्य ज्ञान, विज्ञान अशा महत्वपूर्ण विषयांना डावलून केवळ रिझनिंग आणि गणितावर भर देण्यात आला आहे. पेपर तयार करताना डी.एड. आणि बी.एड.च्या परीक्षार्थीना समोर ठेवण्यात आलेले नाही.
हेही वाचा >>>बुलढाणा: ज्येष्ठ काँग्रेस नेते सिद्धिविनायक बोन्द्रे यांचे निधन; चिखलीतील ‘अनुराधा परिवार’चे शिल्पकार
२०० प्रश्न सोडविण्यासाठी फक्त १२० मिनिटे मिळतात, त्यातही प्रश्नच वाचण्यासाठी एक मिनिटाच्यावर वेळ लागल्याने अनेकांचे ५० ते ६० गुणांचे प्रश्न सुटल्याचा संताप तृप्ती सोनकुसरे या शिक्षिकेने व्यक्त केला. नवोदय विद्यालयाच्या परीक्षेपेक्षाही कठीण पेपर काढल्याने आणि केवळ बुद्धिमत्ता चाचणीवर भर दिल्याने आपण शिक्षक भरतीचा पेपर देत आहोत की नाही, अशी शंका निर्माण झाल्याचेही त्या म्हणाल्या.२०१७ प्रमाणे प्रश्पत्रिका नव्हती. जो अभ्यासक्रम दिला त्यातले फारच कमी प्रश्न होते. प्रश्नांची लांबी, प्रश्न सोडविण्यासाठीचा वेळ आणि गुण याचा ताळमेळ जुळत नाही. आम्ही रात्रंदिवस अभ्यास करून परीक्षेची तयारी केली मात्र परीक्षेचे नियोजन योग्य नसल्यामुळे मानसिक त्रास सहन करावा लागल्याची प्रतिक्रिया देत शिक्षण मंडळाने या परीक्षा पुन्हा घ्याव्यात अशी मागणी लाखनी येथील समर्थ विद्यालयाच्या शिक्षिका शीतल कोमेजवार यांनी केली.
परीक्षा परिषदेने ‘टेट’चे नियोजन ‘आयबीपीएस’ कंपनीकडे दिले आहे. यासाठी लाखो विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. परीक्षा शुल्काच्या माध्यमातून कोट्यवधीची रक्कम गोळा झाली आहे. तरीही परीक्षेचे नियोजन व्यवस्थित का करण्यात आले नाही, असा प्रश्न परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.