लोकसत्ता टीम
नागपूर : वर्गात एकटीच अभ्यास करीत बसलेल्या विद्यार्थिनीला पाहून वासनांध शिक्षकाने तिच्याशी अश्लील चाळे करीत शारीरिक संबंधांची मागणी केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी शिक्षकाविरोधात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. अमोल पाटील (४०) रा. येरखेडा, कामठी, असे आरोपीचे नाव आहे. अमोल विरुद्ध यापूर्वीही विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.
आरोपी अमोल हा कोराडीतील एका खासगी शाळेत शिक्षक असून शिकवणी वर्गही घेतो. शांतीनगर ठाण्यांतर्गत राहणारी पीडित १५ वर्षीय विद्यार्थिनी त्याच्याच वर्गात शिकते. तसेच तिने त्याच्याकडे शिकवणी वर्गही लावला आहे. गत १५ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास विद्यार्थिनी त्याच्याकडे शिकवणीला गेली होती.
आणखी वाचा-यवतमाळमध्ये ‘वंचित’चे बळ नवख्या पक्षाच्या उमेदवारास
इतर विद्यार्थी यायचेच असल्याने ती वर्गात एकटी बसून अभ्यास करीत होती. दरम्यान आरोपी तिच्याजवळ आला. तिला एकटी पाहून त्याने तिच्याशी अश्लील बोलण्यास सुरुवात केली. तिने विरोध केला असता अमोलने तिच्याशी अश्लील चाळे केले. तिला शारीरिक संबंधाची मागणी केली. संबंध ठेवल्यास परीक्षेत पास होण्यासाठी मदत करण्याचे आमिषही शिक्षकाने दिले. मात्र, विद्यार्थिनीने त्याला वारंवार प्रतिकार केला. त्याला अऩेकदा दूर लोटण्याचा प्रयत्न केला. ती चिडल्यामुळे शिक्षकाने माघारी घेतली.
शिक्षकाने तिला कोणाकडेही वाच्यता न करण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलीने घरी परतल्यानंतर आईकडे रडायला सुरुवात केली. या घटनेची माहिती आईला दिली. त्यानंतर शांतीनगर पोलिसात अमोल विरुद्ध तक्रार करण्यात आली. पोलिसांनी पोक्सो व इतर कलमान्वये गुन्हा नोंदवून घटनेचा तपास सुरू केला आहे.